फोटो सौजन्य : shetterstok
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ डिसेंबर २०२४
घेवड्याचं कालवण किंवा घेवड्याची आमटी आठवतीय का मित्रांनो..
हा सिझन फक्त आणि फक्त घेवड्याचा कालवणाचा असायचा..
कालवण झालं की उसळ आण उसळ झाली की कालवण ..नुसता रतीब.
रोज तेच...
पावटा, वाटाणा, चवळी, मुग, मटकी हे पण असायचं त्या मेनूकार्डमध्ये पण थोड्या प्रमाणात ...
पावट्याच्या ठिकरीच्या आमटीची चव दुसर्या कशालाच नाही..इतकी भारी ...
बटाट्याच्या सिझनला फक्त बटाटाच..
बाकी काहीच नसायचं ...
पण त्याची चव अशी होती की आजचं कितीही भारी जेवण त्याच्यापुढं फीकं पडेल..
कधी कंटाळा नाय आला या मेनूचा.
कालवण फक्त तेल, चटणी ,कोथिंबीर एवढेच टाकलेलं होतं पण आजच्या महागड्या मसाल्यांना लाजवेल एवढी अविट गोडी आणि चव होती त्यात..
सगळं नैसर्गिक होतं..
पिकांना रसायनाचं प्रमाण अत्यल्प होतं..
बियाणं असली होतं, हायब्रिड नव्हतं..तेल घरच्या भुईमुगाच्या शेंगाचं ..भाज्या ताज्या..तोडून आणायच्या अन् करायच्या..पाणी शुद्ध होतं ..कुठही प्रदुषणाची कीड लागली नव्हती..
वर्षातून चार पाच वेळा पुरणपोळी, कधीतरी चपाती अन् खूप कमी वेळा भात बनायचा..
आई पुरणपोळी करत असताना तिच्या पदराजवळ बसून लाडालाडानं पुरणाचा गोळा मागायचा..
काय मजा होती तो गोळा खाण्यात ..आताची मुलं खातील का असा पुरणाचा गोळा?
पुरणपोळी, गुळवणी, आमटी आणि भात भन्नाट बेत असायचा..
गुळवणी नावाप्रमाणे गुळाचं...रंग काळा..पोळ्याबरोबर गुळवणी असेल तरच त्याला मजा येते..
पोळ्याची आमटी किती पिवू असं व्हायचं..
घरी रोज दोन तीन भाकरी जास्त बनायच्या..अचानक एखादा पाहुणा आलाच तर असाव्यात म्हणून ..
त्या जर शिल्लक राहिल्या तर दुसर्या दिवशी झकास भाकरीचे तुकडे..शिळ्या भाकरीचे तुकडे पिझ्झा बर्गर पेक्षा भारी वाटायचे..
काय आनंद व्हायचा ते खाताना ..
कधीच ते शिळ्या भाकरीचे आहेत असं वाटलं नाही..
अन्नाच्या प्रत्येक शीताला मान देणारा जमाना होता तो..
हुलग्याचं माडगं अप्रतिम असायचं..
आताच्या कुठल्याचं सुपमध्ये ती ताकत नाय अन् तशी चव पण नाय..
घरी अधूनमधून कधी पाहुणे आल्यावर बोटवं बनायचं..आहाहा काय दाबून खायचे लोकं..मॅगी बीगी बोटव्यापुढं एकदम चिल्लर...
उन्हाळ्यात घरोघरी भातवड्या, खारवड्या, कुरवड्या, पापड, सांडगे बनायचे..
बायका एकत्र येवून चेष्टामस्करी करत हे सगळं करायच्या..
भातवड्याचा चीक साखर घालून असा मस्त लागायचा विचारु नका..
आईनं केललं धपाट्याची चव बहुतेक तिच्या धपाट्यावर उमटलेल्या बोटांच्या ठशांमुळे अविट लागत असावी..
धपाटं करायची पध्दत एकदम भारी ..तव्यावर मस्त गोल केललं धपाटं टाकायचं..
त्यावर ओला कपडा असायचा..
आई बोटानं धपाट्याला भोकं पाडायची..का ते काय आजपर्यंत समजलं..
धपाटं थापताना त्यावर आईच्या हाताच्या पंजाचे ठसे उमटायचे..
आज बनतय ते थालीपीठ ..ते ही बनवणारे बरेचसे पुरुष..त्याला कुठून येणार आईच्या हाताची चव..
बेकरी पदार्थ खूप कमी होते..
बटरं सर्वाधिक लोकप्रिय..
कारण स्वस्त आणि मस्त ..
वाटणी करायला सोपं..
चहाला साखर अलीकडे वापरायला लागले..नाहीतर गुळाचाच चहा..
तो ही काळा गुळ..
छान आणि देखणा गुळ अलीकडे यायला लागला ..तेल्याच्या किंवा वाण्याच्या दुकानात गुळाची काळीमिट्ट ठेप असायची..तिला पाच पंचवीस गांण्या लागलेल्या असायच्या..त्या गिर्हाईकाला चावायच्या..कधी तेल्याला वाण्याला चावल्याचं बघितलं नाही..बहुतेक अन्नदात्याचे उपकार त्यांनाही समजत असावेत..अशा गुळाचा चहा आणि बटरं खायची मज्जा वेगळीच होती..
आता केक, बनमस्का, टोस्ट, खारी सगळं आलं पण ती बटरं खाण्याची मजा नाय येत राव.
हाॅटेलात आजच्या सारखे भरमसाठ पदार्थ नव्हते ..
इडली, डोसा,उत्तापा, समोसा, वडा हे काहीच मिळत नव्हतं.
हाॅटेलं फक्त भेळ, भजी, चहावर चालायची..
पण भजी अशी बनायची साऱ्या परिसरात घमघमाट सुटायचा..
एक प्लेट चार जणात खायची..इतकी गरीब परिस्थिती असायची ..पण माणुसकी इतकी होती जे मिळेल ते वाटून खायची सवय पडली होती..त्यात एक मनस्वी आनंद वाटायचा, समाधान वाटायचं..
आताची आईस्क्रीम नव्हती...आज बाजारात पन्नास प्रकारची आईस्क्रीम मिळतात..पण पुर्वी फक्त एकच मिळायचं..बर्फाचं..गारीगार..
तोंड लालभडक व्हायचं ते खाल्ल्यावर ..
पाच दहा पैशाचं गारीगार खायला मिळणं म्हणजे भाग्याच समजलं जायचं..
गल्लोगल्ली असे गारीगारवाले सायकलवर फिरत असायचे..
काय जादू होती त्या बर्फाच्या कांडीत काय माहित ..पण मिळालं तर कमालीचा आनंद व्हायचा नाहीतर कमालीची हुरहूर लागून राहायची...
त्यावेळी सगळं साधं होतं पण त्यातली मजा काही औरच होती..
शाळा तर लयच भारी ..दप्तर काय तर पाटी अन् पेन्सिल ..हे ठेवायचा तंगुसाची पिशवी..बसायला आपापलं पोतं.
सगळ्यांच्या तुटक्या पाट्या ..
ना पायात चप्पल ना चांगले कपडे..
सगळ्या मुलांचे कपडे एकतर फाटलेले नाहीतर ठिगळं लावलेले..
निकाल एका वाक्यात असायचा
" सगळे पास" एवढाच...
पण शिक्षणाचा दर्जा जबरदस्त होता..
शिक्षक जीव तोडून शिकवायचे..
ही मुलं देशाचं भवितव्य आहे याची जाणीव असायची त्यांना..
अशा भट्टीत तयार व्हायचे विद्यार्थी ...पाया मजबूत व्हायचा...आता शिक्षणाचा दर्जा घसरलाय..
शिक्षक आणि विद्यार्थी आपली जबाबदारी विसरायला लागलेत..दोन्ही बाजूने चुका आहेत..
काही शिक्षक चांगले आहेत पण ते कमी आहेत..
प्रत्येक घरात गरीबी होती.. मोठ्यांचे कपडे पुढच्या वर्षी छोट्यांनी वापरायचे..
वह्या, पुस्तक शिवून तीच जुनी वापरायची..
एखादी स्लीपर असायची घरात ती पण झिजलेली..तीच अलटून पालटून वापरायची..
केसाची स्टाईल वगैरे नव्हतं डायरेक्ट टक्कल करायचं..
कशाचीच लाज वाटायची नाय..कारण सगळे सारखेच..एकाच परिस्थितीत असलेले...
लग्न कमी खर्चात व्हायची ..जेवायला तर शिरा, भात, आमटी..खा दाबून असा प्रकार असायचा..नंतर जेवणात बुंदी आली..वाढणारा अगदी थोडी वाढायचा बुंदी..
लोकं जेवण होईपर्यंत बुंदी परत येईल म्हणून वाट बघायचे पण तो वाढणारा काय परत यायचा नाय..बुंदीची चोरी होण्याचे प्रकार घडायचे त्यावेळी..
नंतर लाडू आले..
आज तर हजार बाराशेचे एक ताट असते लग्नात जेवायला..खूप स्वीट असतात..
खरं सांगा भावांनो शिरा भात आमटीची चव आहे का त्याला..
दारात गुरं होती..म्हशी ,गाई होत्या .. दुधदुबतं घरचं होतं ..शेरडकरडं होती..
दावणीला बैल होते..
पेरणीची लगबग होती..सारा शिवारात बैलाच्या गळ्यातला घुंगराचा आवाज यायचा..
खांद्यावर आसुड टाकलेला रुबाबदार माझा शेतकरी होता..
आता शेतकरी गाडीवर शेतात जातोय..तोही कधीतरी..मातीशी नातं कमी झालयं..
काळ्या आईला छाताडावर ट्रॅक्टर फिरतोय...कधीकाळी जनावरांचे पाय लागलेली ही काळीआई त्यामुळं धाय मोकलून रडतीय पण आम्हाला काय त्याचं ..आम्हाला पैसा मिळतोय तिच्या मनाचं भावनेचं आम्हाला काय करायचयं..
घरी टीव्ही मोबाईल नव्हते त्यामुळे सगळा वेळ मैदानात नाहीतर नदीत..
शाळेचा सोडून सगळा वेळ नुसतं खेळायचं..
काय पोरं खेळायला, पोहायला तरबेज होती..
काटक होती पोरं..
आता टीव्ही आले, मोबाईल आले..
मुलं बधीर व्हायला लागली.. खाताना, झोपताना मोबाईल ..
शरीराला व्यायाम नाही..परिणामी आजार वाढू लागले..मुलं मलूल बनायला लागली..काय भविष्य घडवणार ही मुलं देव जाणे..
जुनं सारं साधं होतं..कमी पैशाचं होतं..
कमी प्रमाणात होतं ..
आज जुन्या झालेल्या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्यात ...
त्यातला सच्चेपणा आवडायला लागलाय..
आज माणूस लबाड झालाय..
पैसा देव झालाय..पैसा भौतिक सुख देईल पण मानसिक समाधान नाही..
भारी करायच्या नादात ओरीजनल हरवून बसलोय आपण..
आता कळायंला लागलय पिझ्झा बर्गरचा उपयोग नाय भाकरीच भारी हाय...
आता कळायला लागलय गाड्या उडवून उपयोग नाय जमीनीवर चालायला पाहीजे..
दारात गाय आण घरात मायचा जमाना गेलाय आता..
आता गाय बरोबर माया बी दारात असा विषय हाय..
सवयी बदलल्या माणूस बदलला..
नातीगोती विसरायला लागलो आपण..
एकमेकांना पाण्यात बघायला लागलो आपण ..
एक दिवस जुनं सगळं आठवणार..बैलाच्या घुंगराचा आवाज ऐकू वाटणार, पायाला माती लागावी वाटणार, शिरा भात आमटी पुन्हा असावी वाटणार...
उगीच पुढारलो आपण असं वाटणार पण त्याला काही काळ जावा लागलं...
हायब्रिडच्या या जगाचा कंटाळा येईल...
आपण पुन्हा एकदा गेलेले दिवस शोधायला लागू..
त्यावेळी वाटलं....
" तेच बरं होतं राव........"
दिनेश फडतरे यांच्या पोस्टवरून साभार...
---