| सांगली समाचार वृत्त |
कवठे महांकाळ - दि. ३ नोव्हेंबर २०२४
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार हे आपल्या सडेतोड वक्तव्याने सर्वांनाच परिचित आहेत. अनेकदा त्यांची वक्तव्ये त्यांना अडचणीत आणणारी ठरलेली आहेत. धरणाबाबतचे त्यांचे वक्तव्य अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. परंतु आता त्यांच्या बिंदास्त वक्तव्याने स्वतःपेक्षा त्यांनी तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील आपल्याच पक्षाचे उमेदवार, माजी खासदार संजय काका पाटील यांना अडचणीत आणणारी वक्तव्य केले आहे.
मागील आठवड्यात स्व. आर आर पाटील यांच्यावर सिंचन घोटाळ्यातील फाईलवरील सहीवरून, स्व. आर आर पाटील यांनी आपला केसाने गळा कापला, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील उमेदवार रोहित पाटील, त्यांच्या भगिनी स्मिता पाटील, खा. विशाल पाटील यांनी तर या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाच आह.. परंतु मा. शरद पवार यांनीही अजित पवार यांच्यावर शरसंधान केले आहे.
तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार तथा सध्याचे उमेदवार संजय काका पाटील यांचे मोठी ताकद आहे. मतदार संघातील दुसरे मातब्बर नेते, सांगली लोकसभेच्या वेळी विरोधी प्रचार केलेले अजितराव घोरपडे सरकार आता संजयकाका पाटील पाठीशी उभे ठाकले आहेत. परंतु त्याच वेळी मतदार संघात स्व. आर आर पाटील याना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचमुळे त्यांचे सुपुत्र विद्यमान उमेदवार रोहित पाटील यांच्याबाबत असलेल्या सहानुभूतीमध्ये, अजितदादा पवार यांच्या वक्तव्यामुळे अधिकच भर पडल्याचे दिसून येत आहे. परिणामी संजयकाका पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून, राजकारणात मुरब्बी असलेले संजय काका आता यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.