| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ नोव्हेंबर २०२४
सांगली काँग्रेसमध्ये पुन्हा लोकसभेचा सांगली पॅटर्न पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्याने माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांची बंडखोरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. मात्र ही बंडखोरी थांबवण्यात काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांना यश आले नाही.
यावरूनच आता आघाडी धर्म पाळून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार काँग्रेसचे नेते करणार का? अशी चर्चा रंगली होती. विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्या अनुपस्थितीवरून तसेच वसंतदादा घराण्याच्या भूमिकेवरून विश्वजीत कदम याना घेरण्याचे प्रयत्न सुरू केले. अशात भरसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यानं बंडखोरीवरून डिवचले. त्यामुळे आक्रमक झालेल्या विश्वजीत कदमांनी थेट पाणउताराच केला. 'मी कोणाच्या बापाला भीत नाही. बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी थेट राष्ट्रवादीला इशारा दिला.
सांगली शहरानजीक नांद्रे येथील पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा विश्वजीत कदम यांना आपल्या भाषणातून डिवचण्यचा प्रयत्न केला. यावेळी आक्रमक झालेल्या विश्वजीत कदम यांनी त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा पायउतार केला. यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, 'कुठे काय बोलायचं याचं भान ठेवलं पाहिजे लोकसभेबाबत बोलाल तर मला खूप काही बोलता येईल. लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेस विचाराचा आमदार निवडून आणलाय आणि त्याने एनडीएला समर्थन दिले आहे. विधानसभेत त्यांची भूमिका काय आहे याच्याशी माझं देणंघेणं नाही. आता मी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत आहे.'
तसंच, 'लोकसभेत कोणी काय केलं हे जर बोलायचं असेल तर मी खूप काही बोलू शकतो ते पचणार असेल तुम्हाला तर मी बोलतो कारण मला कोणाच्या बापाची भीती नाही. मी स्वयंभू आहे. माझे वडील शून्यातून निर्माण झाले आहेत. माझ्या मतदारसंघात माझे गड मजबूत आहेत. बंटी पाटलांच जर कौतुक करायचं असेल बंटी पाटलांसारखं जर मी वागायला लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही.', असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला. 'मी प्रामाणिकपणे सांगली विधानसभेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. पुढचं घराणंसुद्धा प्रतिष्ठित घराणं आहे. जे सांगलीच्या हिताचं आहे. ते जनता निर्णय घेईल.', असेही त्यांनी यावेळी सांगितले.