yuva MAharashtra "पत्रकारांना मालकाचं ऐकावंच लागतं, एक प्रकारे ते गुलामच आहेत"; राहुल गांधींच्या विधानानं वादंग !

"पत्रकारांना मालकाचं ऐकावंच लागतं, एक प्रकारे ते गुलामच आहेत"; राहुल गांधींच्या विधानानं वादंग !


| सांगली समाचार वृत्त |
अमरावती - दि. १७ नोव्हेंबर २०२
पत्रकारांना मालकांचं ऐकावं लागतं, त्यामुळं ते मनासारखं काम करु शकत नाहीत अर्थात ते एक प्रकारे गुलामच झाले आहेत, अशा आशयाचं विधान काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केल्यानं वादंग निर्माण झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे इथं काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शनिवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मीडिया आपल्याला म्हणावी तशी प्रसिद्धी देत नाही, अशी खंत व्यक्त केली. 

या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी मीडियाला देखील लक्ष्य केलं. ते म्हणाले, "वर्षभरापासून आपण संविधान, जातनिहाय जनगणना आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंती तोडणार, हे मुद्दे सातत्यानं मांडत आहोत. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मी आरक्षणाच्या विरोधात असल्याचं सांगत आहेत. पण मीडियाची मेमरी लॉस झाली आहे. कारण त्यांच्यासमोरच हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. 


मीडियावाले हे सर्व दाखवत नाहीत. पण ही त्यांची चूक नाही. कारण त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचं शिक्षण करायचं आहे, त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना मालकांचं ऐकावंच लागतं. एका तऱ्हेने हे गुलाम आहेत, त्यामुळं त्यांच्याशी माझी लढाई नाही. मीडयावाले आमचं काहीही दाखविणार नाहीत. २४ तास मोदींनाच दाखविणार" 

पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणं योग्य नाही - प्रकाश कुलथे

दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानामुळं पत्रकार मंडळी नाराज झाली आहेत. "समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानानं कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची? कसे बोलायचे? हा तुमचा अधिकार आहे. 

पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणंदेणं नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणं योग्य नाही," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी दिली आहे.