yuva MAharashtra संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत !

संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत !


| सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. ६ नोव्हेंबर २०२
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, सभा घेत आहेत, त्यावेळी बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, १४ वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.

"मी सत्तेत नाही. मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षानंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे" असेही बारामतीत दौऱ्यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांनी हल्लाबोल केला आहे. 'काही लोक सांगतात, मी लोकांना भावनिक आवाहन करेन, काही गरज नाही मी माझ्या लोकांना ओळखतो. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवून घेऊया. मला आता आमदारकी नको, खासदारकी नको मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. जर आपल्या विचारांचे सरकार आले तर भक्कमपणे जोगेंद्र इथले प्रश्न सोडवेल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्ही फक्त एका राज्याचे काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता ? तुम्ही मुख्यमंत्रीच व्हा. माझी काही तक्रार नाही असा हल्लाबोलही पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. हे जे काही घडतं आहे ते राज्याच्या हिताचे नाही देशाच्या हिताचे नाही अनेक राज्यात हाताला काम नाही. इथल्या राज्यकर्त्यांनी राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची ते दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचे काम दुसरीकडे चालले आहे. ते थांबवायचे असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही शेतीला पाणी आणि हाताला काम, यासाठी अधिक लक्ष देण्याचे गरजही पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. सरकारचा दृष्टिकोन चांगला लागतो, दुर्दैवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत, असा हल्लाबोलही शरद पवार यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना केला.