| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ नोव्हेंबर २०२४
नाटक हे समजून बघितलं पाहिजे, नाटक ही संस्कृती आहे. आम्हाला नाटक आवडलं नाही, आम्हाला हसायला लावणारीच नाटके आवडतात, अशा प्रतिक्रिया आल्या की तळपायाची आग मस्तकाला जाते, असे स्पष्ट करत जेष्ठ रंगकर्मी श्रीमती सुहास जोशी यांनी नाटक बघायला जाणे म्हणजे, आपण एखाद्या सणाला जातोय असे वातावरण तयार करायला हवे. त्यासाठी शालेय शिक्षणात पाचवीपासूनच नृत्य नाट्य आणि संगीतया विषयी शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनीही नाट्यशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील आद्यनाटककार विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ चित्रपट, नाट्यकर्मी श्रीमती सुहास जोशी यांना नाट्य संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगलीच्या वतीने गेल्या ५६ वर्षा पासून हा पुरस्कार दिला
जातो.. यंदाचे ५७ वे वर्ष आहे. अनेक दिग्गजांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विष्णुदास भावे गौरव पदक आणि २५ हजार रोख रुपये, शाल श्रीफक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी केले. यावेळी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेविषयीची माहिती आणि विष्णुदास भावे गौरव पदकाच्या च्या मानकरी नाट्यकर्मी श्रीमती सुहास जोशी यांचा परिचय प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांनी करून दिला.
यावेळी बोलताना श्रीमती जोशी म्हणाल्या, या पुरस्काराने मी भारावून गेली आहे. आज कालची नवीन पिढी अप्रतिम प्रयोग करत आहे. असे वेगवेगळे प्रयोग होतच राहिले पाहिजेत. हे एक प्रकारचे संशोधन आहे. भिन्न आणि वेगवेगळ्या प्रकारची माणसं नाटक बघायला येतात, हे ध्यानात घेऊन त्या प्रयोगाची रचना झाली पाहिजे. नाटकाचे प्रयोग कसे वेगळे केले पाहिजेत की ज्यामुळे प्रेक्षक पुन्हा मोठ्या संख्येने नाटकाकडे वळतील. शालेय अभ्यासक्रमातूनच नृत्य, नाट्य आणि संगीत याविषयी जर शिक्षण दिले तर त्याचा फायदा केवळ नाटक किंवा कलाकार होण्यासाठीच नाही तर तर आपली वाणी आणि प्रेझेंटेशन सुधारते. नाट्य संमेलना सारख्या ठिकाणी तर प्रांतातील नाटकांचे प्रयोग झाले पाहिजेत. इतर प्रांतात काय चालले आहे नाटकाविषयी याची माहिती मिळाली पाहिजे.