| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ नोव्हेंबर २०२४
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालांमुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे वर्चस्व वाढत असताना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाचा बुरूज ढासळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या बदललेल्या समीकरणांचा मोठा परिणाम होणार आहे. नवे चेहरेही राजकारणात येत असल्याने राजकारणाच्या कार्यपद्धतीतही बदल दिसू शकतो.
जिल्ह्यात महायुतीचे पाच व महाविकास आघाडीचे तीन आमदार निवडून आले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीकडे पाच व महायुतीकडे तीन आमदार होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले होते. आता पुढील पाच वर्षांत महायुतीचे वर्चस्व राहण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा नियोजन समितीसह विषय समित्यांमध्येही त्यांचे वजन वाढणार आहे. पर्यायाने विकासकामे, निधी खर्चाच्या बाबतीतही महायुतीच्या आमदारांचा शब्द अधिक वजनदार ठरू शकतो. महाविकास आघाडीच्या आमदारांवर आता यासाठी संघर्ष करावा लागेल. केंद्रात व राज्यातही भाजप युतीचे सरकार असल्याने त्याचा लाभ सत्ताधारी आमदारांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांमध्येही स्थानिक आमदारांचा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. आमदारकी गेली, तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राहावे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील राहतील. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभा निकालाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांवरही ताबा घेण्याचा ताकदीचा प्रयत्न महायुतीच्या आमदारांकडून, तसेच नेत्यांकडून केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात बाहुबल सिद्ध केले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागेल.
नेत्यांमधील संघर्ष वाढणार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. राजकीय व्यासपीठावरील ही लढाई आता विधानसभेतही दिसून येईल.
युवा नेत्यांच्या हाती दोर
जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीला आता रोहित पाटील, सुहास बाबर, सत्यजीत देशमुख, असे नवे युवा चेहरे दिसणार आहेत. जिल्ह्यातील राजकारणाचे दोरही काही प्रमाणात या युवा नेत्यांच्या हाती गेले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय कार्यपद्धतीचे दर्शनही घडू शकते.