yuva MAharashtra महाराष्ट्रात EVM वरून गदारोळ सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल !

महाराष्ट्रात EVM वरून गदारोळ सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २७ नोव्हेंबर २०२
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत आघाडीचा सुपडा साफ केला. मात्र, या पराभवानंतर आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्रात हा गदारोळ सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ईव्हीएमबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

देशातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकांमध्येही ईव्हीएमचाच वापर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मविआपुढील एक पर्याय आता बंद झाला आहे. आघाडीकडून ईव्हीएमविरोधात देशभरात रान उठवले जाण्याची शक्यता असतानाच हा निकाल आल्याने एकप्रकारे विरोधकांना धक्का बसला आहे.

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट ?

ईव्हीएमविरोधात के. ए. पॉल यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायाधीश विक्रम नाथ यांनी फेटाळून लावली. यावेळी कोर्टाने ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादावर मोठे विधान केले. तुमचा पराभव होतो, तेव्हा ईव्हीएममध्ये गडबड असते आणि तुम्ही जिंकता त्यावेळी ते चांगले असतात, असे कसे असू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टात आपण कोणतेही राजकारण आणलेले नाही. विदेशात अनेक लोकशाही असलेल्या देशांमध्ये मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया होते. त्यामुळे भारतातही अशी प्रक्रिया व्हावी, असे आदेश कोर्टाने द्यावेत, असे याचिकेत म्हटले होते. त्याचप्रमाणे निवडणुकीदरम्यान पैसे, मद्य किंवा इतर वस्तूंचे वाटप करताना आढळून आलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक आयोगाने बंदी घालावी, असे आदेश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती.

इंडिया आघाडीचे देशभर आंदोलन ?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ईव्हीएमविरोधात देशभर आंदोलनाचा नारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत देशभरात ईव्हीएमविरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे. मविआकडूनही महाराष्ट्रात आंदोलन केले जाऊ शकते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत तसे संकेत दिल्याचे समजते.