| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२४
''लोकसभेला विशाल पाटील तुमची कोंडी झाली, तेव्हा दलित समाज पाठीशी ठाम उभा राहिला. तुम्ही भाजपच्या विरोधात लढताय, म्हणून ताकदीनं मतदान केलं, निवडून आणलं. आता तुम्ही भाजपला मदत होईल, असं वागताय. एवढ्या लवकर बदलाल, असं वाटलं नव्हतं. तुम्ही चुकताय. अपक्षाला साथ देणं म्हणजे भाजपला मदत करणं,'' अशी टीका दलित चळवळीचे नेते प्रा. सुकुमार कांबळे यांनी येथे केली.
येथील कच्छी जैन भवनमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. कांबळे म्हणाले, ''विशाल पाटील हे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचे सांगतात. देशात-राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा देतात आणि सांगलीत भाजपला फायदा करण्यासाठी उभ्या असलेल्या अपक्षाला पाठिंबा देतात, हे धक्कादायक आहे. यावर विश्वजित कदम यांनी तातडीने बोललं पाहिजे.
विशाल पाटील हे बाहेर महाविकास आघाडीसोबत आहेत, इथं वेगळं करतात, नागरिकांमध्ये याची खूप चर्चा आहे. त्यांना मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मतदान केले होते. त्यांची ही निवडणूक शेवटची नव्हती, हे लक्षात ठेवावं. भाजपला तुम्हाला मदत करायची असेल तर गाठ बहुजन समाजाशी आहे. आज बहुजन समाज काँग्रेससमवेत आहे. संविधान वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे. त्यात जो भाजपला मदत करेल, त्याने मदतीची अपेक्षा करू नये.''
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, ''विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत. त्यांनी माझ्या प्रचाराचा नारळ फोडला, त्यांनी पूर्ण ताकद दिली आहे. आता विशाल पाटील यांनी जाहीर व्यासपीठावर यावे, पाठिंबा द्यावा, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. सर्वांनी मिळून भाजपचा पराभव करायचा आहे. वेळ गेलेली नाही, अजून ते सोबत येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.''