| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० नोव्हेंबर २०२४
जतमध्ये विना नंबरची गाडी पकडण्यात आली आहे. गाडी पकडल्यानंतर याठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला असून भाजपा बंडखोर अपक्ष उमेदवार तामनगौडा रवी पाटलांच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची वादावादी झाली. गोपीचंद पडळकर यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उमदी पोलिसांकडून गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा थांबल्यानंतर अंर्तगत गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. दरम्यान या प्रचाराच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी गाड्यामधून रोख रक्कम नेली जात असल्याचे आढळून आले आहे. यानंतर एका दिवसावर मतदान येऊन ठेपले असताना (Sangli News) सांगली जिल्ह्यातील जतमध्ये विना नंबरच्या कारमध्ये रॊख रक्कम आढळून आली आहे. सोन्याळ येथे विना नंबर प्लेटची असणारी गाडी तामनगौडा रवी पाटील समर्थकांकडून पकडण्यात आली. यामुळे अपक्ष उमेदवार तामनगौडा रवी पाटलांच्या कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला होता.
जत तालुक्यातील सोन्याळ याठिकाणी विना नंबर प्लेटच्या गाडीतून भाजपचे प्रचार साहित्य आणि पैसे वाटप होत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. जतमध्ये भाजप उमेदवार गोपीचंद पडळकरंकडून पैसे वाटप होत असल्याचे तमन्नगौडा रवी पाटलांचा यांचे म्हणणे आहे. तर ताब्यात घेतलेल्या गाडीतील १ कोटी रुपये पोलीसांचा गाडीतून अन्यत्र हलवण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक कुदळे यांनी ताब्यात घेतलेल्या गाडीतील पैशांची बॅग स्वतःच्या गाडीतून पाठवल्याचा आरोप तमन्नगौडा रवी पाटील यांनी केला आहे.