| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी फड़णवीस आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदारांकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री देण्यासाठई दबाव आणला जात आहे. तर भाजप नेत्यांकडूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जोर लावला जात आहे. विशेष म्हणजे या सर्वात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. या सर्व गदारोळात देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले असून ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकी एकट्या भाजपने 132 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला तर शिंदे गटाला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या.
या सर्व घडामोडींदरम्यान महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या सुत्रावरही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकाला केंद्रात मोठे पद मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद देण्यात आल्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री, अजित पवार आणि श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार आहेत.
या फॉर्म्युल्याद्वारे भाजप तिन्ही पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिंदे यांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही आणि प्रकरणही सहज सुटेल,असे भाजपला वाटत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेचे नेते सातत्याने दबाव आणत असल्याचेही बोलले जात आहे.
शिंदे यांना हटवणे भाजपसाठी इतके सोपे नाही. शिंदे हे मराठा समाजाचे आहेत तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन आणि मराठा नेतृत्वाचा दावाही करण्यात आला. येत्या काळात बीएमसी महानगरपालिकेच्या निवडणुकाही होणार आहेत. भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. आतापर्यंत बीएमसीवर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व आहे. मात्र, यावेळी भाजपला त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.
2022 मध्ये शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून 41 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि त्यांनी ती स्वीकारली. विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री चेहरा म्हणून कोणाचीही घोषणा केली नसून संपूर्ण निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली.