| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ नोव्हेंबर २०२४
भारतीय जनता पक्ष, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा व महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्यावतीने सांगलीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने सांगलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला
बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या अध्यक्षा स्नेहलताई सावंत आणि सिद्धार्थ गाडगीळ यांनी पुष्पहार घालून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वांना जगण्याचा समानतेचा हक्क देणारा महान ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला कळावे या उद्देशाने संपूर्ण देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचा एक चांगला उपक्रम चालू केला आहे. असे मत यावेळी बोलताना सर्वांनी व्यक्त केले. यावेळी भाजप व महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरज येथील दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या बळवंतराव मराठे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, प्रा. एन. डी. बिरनाळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टातून दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवसात संविधान निर्माण झाले. संविधानाने देशाला आणि जनतेला सार्वभौमत्व प्राप्त झाले. भारतीय जनतेला समाजवाद, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता दिली. कष्टकरी, स्त्रिया, शेतकरी व वंचितांना नाकारलेले अधिकार संविधानामुळे मिळाले. भारत हा देश जनतेच्या मालकीचा केला. देशाचं नाव निश्चित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. अल्पसंख्याक व मागासवर्गीय जनतेला विशेष हक्क बहाल करुन विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतले.
यावेळी बोलताना प्रा. एन. डी. बिरनाळे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला राजकीय, सामाजिक व आर्थिक न्याय दिले. देश अखंड राहिला. मतदानाचा अधिकार दिला. स्वातंत्र्य व लोकशाहीचे रक्षण झाले. राष्ट्रीय एकात्मता व पर्यावरण रक्षणात मौलिक योगदान दिले. संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ही भारताची भाकरी, अस्तित्व व अस्मिता आहे. घराघरात संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोहचवणे आणि संविधानाचे संरक्षण व आदर करणे ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
संविधानाने कोणत्याही धर्माचे लाड केले नाहीत अथवा कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. सर्व धर्मीय जनतेला आपापल्या धर्माप्रमाणे उपासना स्वातंत्र्य दिले. भारताला धर्मनिरपेक्ष केलं. हे सारं संविधानामुळे घडलं. असे सांगून प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले की, बहुजन समाजातील लेकरांनी खूप शिकून आपलं घर, समाज व देशाचं नाव उज्ज्वल करणं म्हणजेच संविधानाचा सन्मान करण्यासारखे आहे, असेही प्रा. बिरनाळे यांनी यावेळी बोलताना म्हटले.
प्रारंभी संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधानाचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक व शिव, शाहू, फुले आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुणे परिचय करून दिला.
यावेळी बळवंतराव मराठे विद्यालय व गोखले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळांचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ललिता जोशी, अलका काळे व सुषमा माळी यांनी केले.
तसेच मिरज येथील आस्था बेघर संस्थेतील संविधान दिन संपन्न झाला. संविधान भक्ती, खरी देशभक्ती, संविधान प्रेम, खरे देश प्रेम, हे ब्रीदवाक्य घेऊन निष्ठा सामाजिक संस्था कार्य करीत आहे. म्हणूनच संविधान दिनानिमित्ताने बेघर केंद्रातील महिलांना अत्यावश्यक साहित्य कर्तव्य भावनेने देत आहोत. तरी दानशूर लोकांनी मदत नव्हे, कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निष्ठा सामाजिक संस्थेच्या ज्योतीताई सूर्यवंशी यांनी केले.
संविधान दिनानिमित्त आस्था बेघर महिला निवारा केंद्र येथे आयोजित संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सूर्यवंशी होत्या. यावेळी त्यांनी संविधानातील महिलांच्या विषयी अधिकाराची माहिती दिली. तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बेघर केंद्रांना महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त शिल्पा दरेकर, व्यवस्थापक ज्योती सरवदे संस्थाप्रमुख सुरेखा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम साजरे करण्यात आले. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. यावेळी सारिका कुलकर्णी, यास्मिन मकानदार, सारिका जाधव, श्रुती माने, अश्विनी तेवरे, प्रमोद माळी, चंद्रकांत माळी उपस्थित होते. आभार संस्था प्रमुख सुरेखा शेख यांनी मानले.
मनपा मध्ये संविधान दिन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन व विविध कार्यक्रम आयोजन करून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम मा. आयुक्तसो तथा प्रशासक शुभम गुप्ता (भा प्र स) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अतिरिक्त आयुक्तसो, श्री. रविकांत आडसूळ, मा. उपायुक्तसो विजया यादव (मालमत्ता व्यवस्थापन) यांच्या उपस्थितीत साजरा करतात आला आहे.
महापालिकेच्या सर्व विभाग मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले आहे. मनपाच्या सर्व शाळे मध्ये देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संविधान बाबत माहिती देण्यात आली. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन चिंतामणी कांबळे यांनी केले.
या वेळी सहा आयुक्त आकाश डोईफोडे, नगरसचिव सहदेव कावडे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूरे जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद, विनायक जाधव यांत्रिक अभियंता, वृषाली अभ्यंकर, शिराज नाईकवाडी अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अनेक ठिकाणी संविधान दिन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.