| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेमण्यासाठी देखील बहुमत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता महायुतीच्या सरकारचा शपथविधी लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे विधानसभेचे मैदान मारताच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश दिले. मात्र सध्या महायुतीमध्ये पेच निर्माण झाला असून मुख्यमंत्रीपदावरच महायुतीची गाडी अडली आहे.
देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे अशी सध्या राजकीय वर्तुळाता पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, किमान अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, या मागणीवर शिंदे ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे. शपथविधी देखील ५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंनी नवनिर्वाचीत आमदारांना पुन्हा आपल्या घरी जाण्याचे आदेश दिले आहेत.
एकनाथ शिंदेंनी काय आदेश दिले ?
सध्या एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार हे मुंबईतील हॉटेल ताज लँड्स बांद्रा येथे आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांनी आपल्या मतदारसंघात परत जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा… आपआपल्या घरी जा.. पुढचा निरोप येईपर्यंत मतदारसंघ सोडू नका...
शपथविधीसाठी २ किंवा ५ डिसेंबरला
मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी २ किंवा ५ डिसेंबरला होणार आहे. शपथविधीची तारीख ठरली मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महायुती उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपाल यांच्याकडून २९ तारखेला शपथविधीचे निमंत्रण जारी होईल. २ तारखेपर्यंत महायुतीत कोणाला कोणते खाते दिले जाणार हे निश्चित केले जाईल त्यानुसार २ किंवा ५ डिसेंबरला २९ ते ३० आमदार कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील
स्पष्ट बहुमत तरी मुख्यमंत्रीपद अस्पष्ट
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सध्या अस्पष्ट आहे. शिवसेनेतील नेत्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. महायुतीने ही निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली व त्यांचा चेहरा जनतेसमोर होता. लाडकी बहीण व अन्य योजनांचे यश त्यांच्यामुळे असल्याने मुख्यमंत्रीपदावर शिंदे यांचा हक्क असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. दुसरीकडे भाजपला 132 जागा मिळाल्या असून सहा-सात अपक्ष व लहान पक्षांचा भाजपला पाठिंबा आहे.