| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० नोव्हेंबर २०२४
सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी 390 बसेस मंगळवारपासून दोन दिवस तैनात करण्यात आल्यामुळे सर्वच आगारातील बससेवा मंगळवारी कोलमडली. बुधवारीही याचा परिणाम राहणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली. मंगळवारी जवळपास 70 टक्के लांब, मध्यम व स्थानिक बस सेवेत कपात करण्यात आली होती. त्यामुळे कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांचे हाल झाले.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान घेण्यासाठी 2 हजार 482 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यासाठी सुमारे साडेतेरा हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामुळे एसटीकडून 580 वाहने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. यामध्ये जवळपास चारशे बसेस घेतल्याने बस प्रशासनावर ताण आला आहे. यामुळे काही ठिकाणच्या लांब आणि मध्यम पल्ल्याची आणि स्थानिक बस वाहतूक रद्द करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील दहाही आगारामध्ये सुमारे 720 बसेस आहेत. यातील जवळपास चारशे बसेस निवडणुकीच्या कामात गुंतल्याने दहाही आगारातील बससेवा पूर्णपणे कोलमडली होती. मंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी सातपासून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत या बसेस प्रशासनाच्या ताब्यात असणार आहेत.
मंगळवारी दिवसभर सुमारे तीस टक्के बस वाहतूक सुरू असल्यामुळे काही बसेससाठी मोठी गर्दी होती. पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती आदी बस सेवेत कपात करण्यात आली होती. स्थानिक परिसरातील बसेस बंद ठेवण्यात आल्याने अभियांत्रिकीसह इतर महाविद्यालयांना जाणार्या विद्यार्थ्यांचे हाल झाले.