Sangli Samachar

The Janshakti News

मुंबई-पुणे महामार्गावरील ई-शिवनेरी बसमध्ये अवतरणार 'शिवनेरी सुंदरी', गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी महामंडळाचा निर्णय !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ ऑक्टोबर २०२४
एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेकविध उपाय योजना आखण्यात येत आहेत. यामध्ये महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट, 70 वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास याबरोबरच बसस्थानके आणि बसेसचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून महामंडळाने ई-बसेस बरोबरच अत्याधुनिक बसेसचा महामंडळाच्या ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मुंबई पुणे महामार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्यात येणार असून, यासाठी प्रवाशावर कोणताही अधिभार लावण्यात येणार नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी नुकत्याच पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीमध्ये बोलताना दिली.

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. ही 304 वी बैठक होती. यावेळी विविध खात्याच्या 70 हून अधिक धोरणात्मक विषयावर चर्चा होऊन, हे विषय मंजूर करण्यात आले. याच बैठकीत मुंबई-पुणे महामार्गावरील ई- शिवनेरी बसमध्ये हवाई सुंदरीच्या धर्तीवर 'शिवनेरी सुंदरी' परिचारिका नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.


शिवसेनेचे तत्कालीन नेते स्व. आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील 343 बस स्थानकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'आनंद आरोग्य केंद्र' सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांबरोबरच बस स्थानकाच्या परिसरातील नागरिकांनाही योग्य दरामध्ये आरोग्य सेवा व औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी नेमण्यात आलेल्या सक्षम संस्थांना आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध विक्री केंद्र स्थापन करावयाचे आहे. हे येथे येणाऱ्या प्रवाशांना नागरिकांना आकारण्यात येणारे दर ठरवून देण्यात येणार आहेत.

या बैठकीत आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, महिला सक्षमीकरण अंतर्गत बचत गटांना आपले अन्नपदार्थ विक्री करण्यासाठी, बस स्थानकावर चक्रीय पद्धतीने नाममात्र भाड्यात स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णयाबरोबरच महामंडळ अडीच हजार साध्या बसेस खरेदी करणे, त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर 100 डिझेल बसेसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे. या निर्णयालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली

या महत्त्वपूर्ण बैठकीस एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, त्याचप्रमाणे एस टी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.