| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑक्टोबर २०२४
माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या प्रेरणेतून 2008 साली पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाकरिता तासगाव तुरीची फाटा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात आले. येथून प्रशिक्षित होऊन दोन बॅच बाहेर पडल्यानंतर या ठिकाणीच पोलीस शिपाई प्रशिक्षणही सुरू करण्यात आले. पोलीस अधिकारी किंवा शिपाई म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, त्याला या केंद्रात प्रशिक्षण देण्यात येत होते.
परंतु 'सदरक्षणाय खलनिग्रणाय' याचे धडे गिरवत असतानाच, बरोबर याच्या उलट अनुभव येथील प्रशिक्षणार्थींना आला आहे. शारीरिक सरावाचा त्रास नको असेल, प्रशिक्षणात सवलती हव्या असतील तर एक हजारापासून चार हजार पर्यंत रक्कम काही प्रशिक्षणार्थीकडून घेण्यात आल्याची खळबळजनक घटना घडल्या नंतर, संबंधितावर कारवाई करण्याऐवजी प्रशिक्षण केंद्रातील सेवा खंडित करून त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्यात आल्याने सर्वत्र टीका होत आहे.
प्रशिक्षण घेत असताना कारवाई झाल्यास किंवा नापास होण्याची भीती घालून येथील प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी कडून रक्कम उकळत होते. याबाबत तक्रार केली तर आपल्यावरच कारवाई होईल या भीतीने संबंधित प्रशिक्षणार्थी याबाबत वरिष्ठानकडे वाच्छता करीत नव्हते. याचाच फायदा या प्रशिक्षकांना मिळाला, आणि असे प्रकार वाढीस लागले असल्याची चर्चा होत आहे.
महसूल खात्यानंतर पोलीस खाते भ्रष्टाचाराच्या बाबतीत आघाडीवर असल्याची चर्चा होत असते. जनतेला याबाबतीत अनेक कटू अनुभवही आले आहेत. आणि कदाचित याची सुरुवात अशा पवित्र ज्ञान मंदिर मांडल्या जाणाऱ्या, प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या अधिकाऱ्यांनी व शिपायांना धडे देण्यात येतात की काय ? अशी टीकाही होत आहे.
परंतु तुमची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी मात्र या आरोपाचे खंडन केले असून आमच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही तेव्हा असा प्रकार घडला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.