| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील ३० विद्यार्थ्यांनी परिस फाउंडेशनला भेट देऊन मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील कार्यप्रणालीचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांना परिस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजित पाटील यांनी संस्थेच्या सुरुवातीपासूनचा प्रवास व तत्त्वज्ञान याविषयी माहिती दिली. त्यांच्या उपस्थितीत संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. एन. चौगुले, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य, तसेच निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर हळींगळे उपस्थित होते. मानसशास्त्र विभाग प्रमुख श्री. समीर पाचोरे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एक अनमोल अनुभव मिळाला.
डॉ. हळींगळे यांनी परिस फाउंडेशनची कार्यशैली ‘वाहत्या झऱ्यासारखी’ असल्याचे सांगत, संस्थेच्या वैद्यकीय, शैक्षणिक, मानसिक आणि प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करताना येणाऱ्या शासकीय अडचणींवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
डॉ. पी. एन. चौगुले यांनी परिस फाउंडेशनच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील कार्यप्रवासाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना कष्ट, संयम आणि समर्पणामुळे मानसशास्त्र सेवेत यश मिळवता येते, हे अधोरेखित केले.
मानसशास्त्र विभाग प्रमुख, श्री. समीर पाचोरे यांनी परिस फाउंडेशनच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले आणि संस्थेच्या विविध कार्यांमुळे मानसशास्त्र विषयातील योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
परीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजित पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर परिसच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. त्यांनी शाळांमधील पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले असून, हजारो विद्यार्थ्यांच्या क्षमता मापन व विकास करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय, हॉस्पिटल क्षेत्रातील मानसिक आरोग्य सेवांचे योगदान, थेरपी वापर, आणि संस्था व विविध संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य समाधानीकरणाचे प्रयत्नही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भविष्यात ऑनलाइन मनोमापन चाचण्यावरील भर आणि एआय तंत्रज्ञानाचा मानसशास्त्रीय सेवांसाठी वाढता उपयोग परिस मार्फत केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे समन्वयक श्री. जितेंद्र उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना परिस फाउंडेशनची कार्यप्रणाली आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राध्यापक पूजा नरगच्चे आणि दीप्ती गरवारे यांनी उत्कृष्ट समन्वय ठेवत भेट यशस्वी केली.
या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना परिस फाउंडेशनच्या मानसशास्त्रीय सेवांचा सखोल अभ्यास करता आला, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी होऊन भविष्यात मानसिक स्वास्थ्य क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. यामुळे मानसिक आरोग्याच्या संधींबद्दल त्यांचा दृष्टिकोन विस्तृत झाला आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन एक समृद्ध व्यावसायिक अनुभव त्यांनी मिळवला आला, याबद्दल विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.