yuva MAharashtra सांगली महापालिकेची ग्रामपंचायत करा समस्याग्रस्त नागरिकांची मागणी !

सांगली महापालिकेची ग्रामपंचायत करा समस्याग्रस्त नागरिकांची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
'सांगली आमची बहु चांगली' हे घोषवाक्य सांगली शहराच्या बाबतीत सुपरिचित. शांत, रम्य, महत्त्वाचे व्यापारी केंद्र, बँकांसह इतर सर्वच सोयीसुविधा. इथला साखर कारखाना जगप्रसिद्ध, इथलं वैद्यकीय क्षेत्र सर्वदूर परिचित, इथली हळद, इथला गुळ, इथली नाट्य पंढरी... किती किती म्हणून वर्णन करावं... मनाला भुरळ घालणारा हे शहर अलीकडे सेवानिवृत्तांचं आवडतं शहर... इथं महापालिका... या महापालिकेने नुकताच रौप्य महोत्सव साजरा केला... ऐकायला किती बरं वाटतं ना ?...

पण एकेकाचं हे सारं वैभव आता लयाला जात आहे. इथला साखर कारखाना नावालाच सहकारी, इथला शांतपणा आणि रम्यपणा प्रदूषणात हरवलेला, अनेक कारणांनी व्यापारी वर्ग त्रस्त, इथली वैद्यकीय सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली, नाही म्हणायला इथली हळद, इथला गुळ आणि येथील नाट्य पंढरी अजूनही आपले वैभव टिकवून आहे... आता इथल्या महापालिकेबद्दल काय बोलावं !... ही महापालिका केवळ टॅक्स वसूल करण्यापूर्वीच कोरली आहे की काय अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच सांगलीकर नागरिकांनी महापालिकेची ग्रामपंचायत करा, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे.


सध्या सांगलीतील प्रमुख रस्ते पूर्णतः उखडलेले आहेत. काही ठिकाणी तर अर्धा फुटाहून अधिक मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनाचा आणि शरीराचा खुळखुळा. संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, त्यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार जडू लागले आहेत. ड्रेनेज व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली आहे. पिण्याचे पाणी पिण्यायोग्य आहे का ? हा संशोधनाचा विषय... किती वर्णन करावं इथल्या समस्यांचा आणि अनास्थेचे... 

असं असूनही सांगलीचे खासदार आणि हॅट्रिकच्या तयारीत असलेले आमदार मूग घेऊन गप्प आहेत. महापालिका बरखास्त झाल्यामुळे इथल्या माजी नगर सेवकांना कोणी जुमानासे झाले आहे. केवळ माजी नगरसेवक ही पदवी लावण्याची अधिकार कोरले आहेत. महापालिकेत अधिकारी राज्य निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल घेण्यास कोणालाही वेळ नाही.

या साऱ्याचे पडसाद आता सांगली विधानसभा निवडणुकीवर पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. येथे समस्याग्रस्त नागरिक विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.