| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १ ऑक्टोबर २०२४
मागील आठवड्यातच मिरजेच्या आजी माजी नगरसेवकांनी सांगलीचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमातून जाहीर झाली होती. त्यावेळी लोकसभेप्रमाणे मिरज पॅटर्न यावेळी सुरेशभाऊंच्या मागे राहिल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र आता काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवकांनी यु टर्न घेतला आहे.
याबाबत मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी एका पत्रकार बैठकीत याबाबत खुलासा करताना म्हटले आहे की, पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांनी पक्षाचा विचार न करता प्रभागाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक ना. सुरेशभाऊंच्या कार्यालयात गेलो होतो. परंतु आम्ही त्यावेळी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे कुठेही बोललो नव्हतो. त्यामुळे कोणी या बैठकीच्या चुकीचा अर्थ लावू नये, आम्ही काँग्रेसचे नगरसेवक आहोत, आमचे नेते खा. विशाल दादा पाटील, विश्वजीत कदम, जयश्री पाटील हेच आमचे नेते आहेत. आम्ही काँग्रेसचा प्रचार करणार आहोत, कोणी काही सांगितले म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा दिला असे त्याचा अर्थ होत नाही. आमच्या विरोधात काम करणाऱ्यांनी तर अशी बातमी पसरवली आहे, त्यामुळे जनतेत उलट सोबत चर्चा सुरू आहे. आमचा भाजपला पाठिंबा आहे असे कोणतेही विधान मी किंवा आमच्यापैकी कोणीही केलेले नाही, असे संजय मेंढे यांनी बोलताना सांगितले.
या पत्रकार बैठकीसाठी अय्याज नायकवडी, करण जामदार, वहिदा नाईकवाडी यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.