| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ सप्टेंबर २०२४
सांगली येथील राजनंदिनी संतोष पाटील हिला फिट्स च्या त्रासामुळे (Hypoxic Ischemic Encephalopathy with Status Epilepticus) दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी न्यू लाइफ आयसीयू आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विश्रामबाग सांगली येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉ. वसीम मुजावर, डॉ. रविराज कांबळे तसेच डॉ. विक्रम कोळेकर यांनी खूप शर्तीचे प्रयत्न करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने तिची ब्रेन डेथ झाली.
डॉ. वसीम मुजावर यांनी नातेवाईकांना दुःखद प्रसंगी धीर देऊन, आपण राजनंदिनीचे अवयवदान करू शकता असा सल्ला दिला. तेव्हा राजनंदिनी च्या कुटुंबीयांनी यास तात्काळ मान्यता दिली. तेव्हा डॉ.विक्रम कोळेकर आणि डॉ. वसीम मुजावर यांनी ताबडतोब दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर डॉक्टर हेमा चौधरी यांच्याशी संपर्क साधला. राजनंदिनीचे काका धनंजय पाटील तसेच वडील संतोष पाटील, आई सुवर्णा पाटील यांनी आपली मुलगी जरी गेली असली तरीसुद्धा अशा दुःखद प्रसंगी मानवतावादी दृष्टिकोनातून सात ते आठ जणांचे जर प्राण वाचणार असतील तर आम्ही अवयव दानासाठी तयार आहोत, अशी संमत दाखवली.
त्यानंतर डॉक्टर आनंद मालानी यांच्या सल्ल्याने राजनंदिनीला एन.टी.ओ.आर.सी. मान्यताप्राप्त उषःकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, येथे ॲडमिट करण्यात आले. तेथे सर्व काळजी घेऊन, कार्डियाक ॲम्बुलन्सने शिफ्ट करण्यात आले. यासाठी डॉ परीख, डॉ.कोगरेकर आणि डॉ. मालानी यांचे सहकार्य लाभले. राजानंदिनीच्या ब्रेन डेथ बाबत सर्व टेस्ट केल्यानंतर अखेर आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी राजनंदिनी चे लिव्हर आणि दोन्ही किडनी हे अवयव तसेच कॉर्निया म्हणजेच नेत्रदान सफल झाले.
स्वतःच्या कुटुंबावर असे दुःखाचे आभाळ कोसळल्यानंतरही मानवतावादी दृष्टिकोनातून अवयव दानाचा / विचार करणारे पाटील कुटुंबीय यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. संतोष पाटील कुटुंबियांच्या उदार मनाने ज्या 6-7 लोकांना जीवदान मिळाले त्यांच्या माध्यमातून 'राजनंदिनी ' आपल्यात नक्कीच 'अजरामर ' राहणार आहे, असे दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा समन्वयक,डॉक्टर हेमा चौधरी यांनी म्हटले आहे.