Sangli Samachar

The Janshakti News

कडेगाव येथील दिवंगत नेते स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. डॉ. विश्वजीत कदम यांची राजकीय ताकद वाढली !


| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ६ सप्टेंबर २०२४
काल कडेगाव येथे महाराष्ट्राचे दिवंगत नेते व माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या लोक तीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा अनावरणाच्या निमित्ताने देश आणि राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली होती, त्याचबरोबर सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जनसागर लोटला होता. संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन, उपस्थित नेते व नागरिकांची सुयोग्य व्यवस्था यामुळे सर्वचजण याबद्दल कौतुक करताना दिसले.

या पार्श्वभूमीवर आ. डॉ. विश्वजीत कदम यांची राजकीय ताकद वाढल्याचे दिसून आले. वरिष्ठ नेत्यांबरोबरच जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची त्यांचा असलेला सलोखा यानिमित्ताने पहावयास मिळाला. परिणामी त्यांच्याबद्दलची आपुलकीची भावना आणखीनच वाढीस लागली आहे. त्यामुळे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील काँग्रेसमध्ये त्यांचे राजकीय वजन वाढणार असल्यामुळे भविष्यात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.


स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे रिकाम्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचले. परंतु त्यानंतर त्यांनी केवळ पलूस कडेगाव मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात किंबहुना संपूर्ण राज्यात स्वतःचा गट निर्माण केला. या गटाला राजकीय आणि आर्थिक ताकद देण्याबरोबरच, महत्त्वाच्या पदांवर अनेक कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. जत विधानसभा मतदारसंघात विक्रमसिंह सावंत आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना विजयी करण्यात डॉ. विश्वजीत कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. इतकेच नव्हे तर, राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात त्यांनी आमदारांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर आघाडीतील उमेदवारांच्या विजयासाठी मोलाची भूमिका बजावावी लागणार आहे.