| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ६ सप्टेंबर २०२४
खा. विशाल पाटील आणि आ. जयंत पाटील यांचे राजकीय हाडवैर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. लोकसभेपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हे वैर उफाळून येते. परंतु जाहीर एखाद्या कार्यक्रमात या नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगत असतो. यामुळे उपस्थितांची करमणूक होते. याचाच प्रत्यय कडेगाव येथील महाराष्ट्राचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या लोक तीर्थ स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित श्रोत्यांना पहावयास मिळाला.
खा. विशाल पाटील व आ. विश्वजीत कदम हे दोघेही शेजारी शेजारी बसून जवळपास अर्धा तास हास्यविनोदात रमले होते. संपूर्ण सभास्थानी आणि काल दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात याच विषयाचे चर्चा रंगली होती. यावेळी व्यासपीठावरून राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार यांच्याप्रमाणेच अनेकांची भाषणे झाली. परंतु या दरम्यान या उभय नेत्यांमध्ये गप्पा आणि हास्यविनोद होत असल्याचे पहावयास मिळाले.
सांगली जिल्ह्यातील दादा बापू वाद सर्वश्रुत आहे. या टोकाच्या वादाचा अनेकदा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याच्याही पहावयास मिळाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ. जयंत पाटील यांच्या भूमिकेवरून जोरदार वाद रंगला होता. आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील या दोघांनीही या पुढील निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही अप्रत्यक्षरित्या आ. जयंत पाटील यांना दिला होता. त्यामुळे काल झालेल्या डॉ. विश्वजीत कदम यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई होणार का ? महाआघाडी एकसंघपणे, मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे एकत्रित लढणार का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.