Sangli Samachar

The Janshakti News

'माझी वसुंधरा' अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषदेने मिळवला राज्यात प्रथम क्रमांक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ सप्टेंबर २०२४
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावून अभिमानास्पद कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे 16 ग्रामपंचायतीने विविध गटात यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे देणार येणाऱ्या 130 बक्षीसांपैकी 18 बक्षिसे मिळवून जिल्ह्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या बक्षिसांच्या माध्यमातून जिल्ह्याला सुमारे 9 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम मिळाली असून लवकरच मुंबईत मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे. दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने 2020 पासून या अभियानाची सुरुवात झाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा परिषदेने राबविण्यात आलेल्या या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या.


सांगली जिल्हा परिषदेमार्फत या उत्तुंग यशाबद्दल एका प्रसिद्धीपत्रकामधून माहिती देण्यात आली असून यामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत गटामध्ये दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कासेगाव (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने 1 कोटी 25 लाख मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच राज्यस्तर उत्तेजनार्थ पुणे विभागात येळावी (ता. तासगाव) आणि कवलापूर (ता. मिरज) या ग्रामपंचायतींने कामगिरी केली आहे. पाच हजार ते दहा हजार लोकसंख्या गटामध्ये येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे. तसेच भूमी थिमॅटिकमधील उच्चतम कामगिरीमध्ये ही ग्रामपंचायत प्रथम आली आहे. या ग्रामपंचायतीला एकूण 2 कोटी 25 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. राज्यस्तरावर उत्तेजनार्थ वाटेगाव (ता. वाळवा), समडोळी (ता. मिरज) या दोन ग्रामपंचायतीने कामगिरी केली आहे. विभागस्तरावर वसगडे (ता. पलूस) व नागठाणे (ता. वाळवा) या दोन ग्रामपंचायतींनी कामगिरी केली आहे. अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्या गटामध्ये नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) ही ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे. या ग्रामपंचायतीला एकूण 1 कोटी 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच पुणे विभागामध्ये बोरगाव व घाटनांद्रे या ग्रामपंचायतींनी बक्षीस मिळविले आहे.

भूमी थिमॅटिकमध्ये उंचउडी प्रकारात लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायत उत्तेजनार्थ आली आहे. पुणे विभागामध्ये बनेवाडी व खंडोबाचीवाडी या दोन ग्रामपंचायती क्रमांकात आल्या आहेत. भूमी थिमॅटिकमधील उच्चतम कामगिरीमध्ये पुणे विभागामध्ये कुंडलापूर व कौलगे या दोन ग्रामपंचायतींचा क्रमांक आला आहे. हे अभियानामध्ये सर्व पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे या प्रसिद्धी पत्रकार नमूद करण्यात आले आहे.