| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ सप्टेंबर २०२४
श्री गजानन म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य. महाराष्ट्रातील असे एकही गाव सापडणार नाही जिथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळात श्री गणेशाची प्रतिष्ठापना होत नाही. किंबहुना गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने आपल्या घरीही श्री गणेशाचे प्रतिष्ठापना करीत असतात. सांगली आणि श्री गणेश अतूट नाते. सांगलीचे गणपती मंदिर हे संपूर्ण राज्यात किंबहुना देश विदेशात सुप्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षात या मंदिरात झालेल्या सुधारणांमुळे येथे राज्यभरातून नव्हे तर देशभरातून गणेश भक्त येत असतात. या गणपती मंदिराला खूप मोठा इतिहास आहे.
असाच एक सव्वाशे वर्षाचा इतिहास असलेला श्री गणेश सांगलीत आहे, ज्याला 'सांभारे गणपती' म्हणून ओळखले जाते. सांगली संस्थांचे राज वैद्य आबासाहेब सांभारे यांनी या गणपतीची स्थापना केली आहे. प्रतिवर्षी या मूर्तीची प्रतिष्ठापना दशमेला केली जाते. आज आबासाहेब सांभारे यांची चौथी पिढी तिथल्याच श्रद्धेने, पवित्रतेने ही परंपरा नियमित ठेवली आहे.
1952 पर्यंत या सांभारे गणपतीचे अनंत चतुर्थी दिवशी पारंपारिक वाद्याच्या नेतात मिरवणूक काढली जायची. परंतु नंतर विजेचे खांब आणि रस्त्यामधून गेलेल्या विजेच्या तारा त्यामुळे मिरवणूक बंद करण्यात आली. परंतु गणेश चतुर्थी नंतर दशमीला गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आनंद चतुर्दशी पर्यंत मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अनेक दिग्गज मान्यवरांनी या सांभारे गणपतीचे दर्शन घेतलेले आहे.
सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात येणाऱ्या दिग्गज गायकांनी सांभारेगणपती समोरही आराधना केल्याची परंपरा आहे. येथे अगदी लता मंगेशकर यांच्यापासून उस्ताद अलदिया खान, अब्दुल करीम खान, मोगुबाई कुर्डीकर, कागलकर बुवा, दिनानाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या ठिकाणी आपली सेवा सादर केली आहे.
आजच्या पिढीला या सांभारे गणपती बाबत अभावानेस माहिती असेल. सांगलीचे राजवैद्य आबासाहेब सांभारे हे घरी शाडूच्या गणेशाची स्थापना करीत असत मात्र एकदा मूर्ती दुखावली गेल्याने प्राणप्रतिष्ठापना होऊ शकली नाही. प्रथेप्रमाणे गणपती बसवायचाच म्हणून लाकडी मूर्ती तयार करण्यात आली, जी बनवण्यासाठी दशमीचा दिवस उजाडला. त्यामुळे तेव्हापासून आज पर्यंत दशमी दिवशीच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. . सण 1888 साली दुर्मिळ अशा पांगिराच्या झाडाच्या लाकडापासून पुण्याचे गोविंद स्वतः यांनी या मोर्चेचा आराखडा तयार केला. त्यानुसार वासुनाना घाडगे यांनी कागदाचा लगदा वापरून मूर्तीला आकार दिला. 14 फूट उंच व नऊ फूट रुंद तसेच दीड टन वजनाची गणेश मूर्ती तयार करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला.
1899 साली पहिल्यांदाच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सांभारे वाड्याच्या मध्यावर ही मूर्ती ठेवण्यात आली. 1928 साली पहिल्यांदा या मूर्तीचे ट्रक मधून सांगली शहरातील मारुती चौक, बालाजी चौक, पटेल चौक, श्री गणपती मंदिर, टिळक चौक या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली ही मिरवणूक कुंभार खिंडीतून पुन्हा सांभारे वाड्यात आणण्यात आली. 52 पर्यंत प्रतिवर्षी ही मिरवणूक काढण्यात येत होते परंतु नंतर मिरवणूक मार्गावरील विजेचे खांब व विजेच्या तारा मिरवणुकीस अडथळा ठरल्याने या मिरवणुकीमध्ये खंड पडला.
यंदा मात्र आबासाहेब सांभारे यांच्या चौथ्या पिढीने पुन्हा त्याच श्रद्धेने व पारंपारिक पद्धतीने ऐतिहासिक सांभारे गणपतीची मिरवणूक काढण्याची जयत तयारी करण्यात आली असून, यावेळी लेझीम, टाळ, मृदुंग आणि पारंपरिक वेशभूषासह पुरुषांबरोबरच महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.