Sangli Samachar

The Janshakti News

नको रे मना क्रोध हा खेदकारी - (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ६ सप्टेंबर २०२४
‘क्रोधात् भवति संमोहः, संमोहात् स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः, बुद्धिनाशात् प्रणश्यति।।’ अर्थात क्रोधाने मोह निर्माण होतो, मोह संमोहन, स्मृति विभ्रम, उत्पन्न करतो, स्मृती भ्रमित झाली की, बुद्धिचा नाश होतो व बुद्धिचा नाश झालेला मनुष्य नष्ट होतो. श्रीमद्भगवद्गीतेच्या अध्याय २ श्लोक ६३ मध्ये भ. श्रीकृष्णांनी क्रोध-रागामुळे सर्वनाश होतो असा उपदेश अर्जुनाच्या माध्यमातुन सर्व लोकांना केला आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आजवरच्या माझ्या जीवनामध्ये खुप वेळा आला आहे.   

माझा स्वभाव पहिल्यापासून खूप रागीट. राग आल्यावर माझा स्वतःवरचा ताबा सुटुन समोरच्या व्यक्तिचे वय, अधिकाराचा विचार न करता रागाने मी कांहीही बोलत असे. कधीकधी तर मारहाणही करीत असे. माझ्या अशा वागण्यामुळे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, मित्रांशी माझे संबध बिघडले, कांही चांगले मित्र मी गमावले. प्रसंगी मला आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. सर्वजण माझ्या रागीट स्वभावाची निंदा करत. याचा परिणाम माझ्या इच्छेविरूद्ध, मनाविरूद्ध घटना वारंवार घडण्यात (खरं तर मी स्वतःवर ओढवून घेण्यात) आणि मला जास्त राग येण्यात होत असे. एका वाईट दुश्चक्रामध्ये सापडून माझे जीवन मानसिक त्रास, दुःख या सोबत पुढेपुढे सरकत होते. पण दैनंदिन जीवनातील धावपळीत मी इतका व्यस्त असे की रागामुळे होणाऱ्या माझ्या दुःस्थितीकडे, नुकसानीकडे लक्ष देण्यास मला वेळ नसे.

कांही काळ असाच गेला. माझ्या कुवतीच्या मर्यादा व रागावल्याने होणारे माझे नुकसान, मानसिक त्रास, दुःख मला समजू लागले. अचानक माझ्या जीवनामध्ये कांही अनपेक्षित घटना घडल्या. मनाला शांती, आनंद, सुखाची ओढ लागली. त्यामुळे व वाढत्या वयामुळे माझ्या मनाचा कल अध्यात्माकडे झुकला. अलिकडील कांही वर्षांमध्ये माझ्या स्वभाव थोडा शांत झाला असून राग येण्याचे प्रसंग कमी झाले आहेत. माझ्या खुप रागीट स्वभावातील हा बदल घडून येत असताना रागाबद्दल मला जे कांही समजले ते खालील परिच्छेदांमध्ये मी देत आहे.


राग म्हणजे काय ? राग समूळ नष्ट करण्यासाठी, किमान त्याला आवर घालण्यासाठी सर्वात प्रथम राग म्हणजे काय हे समजावून घेणे जरूरीचे आहे. राग ही आनंद, दुःख, चिंता, तिरस्कार अशा भावनांसारखीच एक भावना आहे, जी कृती, प्रतिक्रिया, हावभावातून बाहेर दिसून येत असते. रागावलेली व्यक्ति आरडाओरडा करते, मोठ्याने बोलते, बोलतांना कटु-वाईट अपशब्दांचा वापर करते, कधी गप्प बसुन, लोकात मिसळणे-वावरणे टाळून, एकलकोंडे राहून, बैचैन-अस्वस्थ राहून, तर कधी आक्रस्ताळीपणाने हातवारे करत आदळआपट करते, राग आलेल्या व्यक्तिचा चेहरा लाल होतो, आकसतो, श्वास जोरजाराने चालतो, डोळे मोठे होतात, प्रसंगी हार्ट ॲटॅक, पॅरालिसीसचा झटकासुद्धा येतो. 

राग कुणाला येतो? लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्ति, रस्त्यावर भीक मागणारे भिकारी ते महालात राहणारे श्रीमंत, आशिक्षित, अर्धशिक्षित व्यक्ति पासून विद्वान व्यक्तिपर्यंत, बेकार, बेरोजगारापासून ते व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार सर्वांना राग येतो. देवदेवता, ऋषी-मुनींना राग आल्याच्या कथा आहेत. राग येत नाही अशी व्यक्ति खूप विरळा आहे. 

रागाची मूळ कारणे - हल्लीच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या, ताणतणावाच्या जीवनामध्ये राग येण्याची खूप कारणे आहेत. उदाहरणार्थ ट्रॅफिक जाम, अचानक बंद होणारा वीजपुरवठा, सुट्या पैशावरून कंडक्टरशी वाद, रिक्षावाल्याचे मिटरपेक्षा जास्त भाड्याची मागणी करणे, सहकारी कर्मचा-यांच्या कामात चुका, दिरंगाई, कामचुकारपणा, मुलांची गैरवर्तणूक, इतरांकडून फसवणूक, अपमान, निंदा इत्यादि क्षणाक्षणाला घडत असतात. वरवर पाहता दैनंदिन जीवनातील या व अशा घटना राग येण्यास कारण भासतात. परंतु त्यांचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की, राग येण्याला या घटना कारण नसून या घटनांच्यामुळे मनामध्ये भीती, वेदना, निराशा, ताण-तणाव, अन्याय, अहंकार, नुकसान, स्वार्थ, लोभ, नैराश्य ... यासारखे जे विचार उत्पन्न झाले ते आहेत. थोडक्यात, राग येण्याची मूळ कारणे बाह्य परिस्थितीत नसून मनातील चुकीच्या, नकारार्थी, अयोग्य विचारात आहेत. 

राग आवरण्याची तंत्रे, मर्यादा व परिणाम - मनामध्ये निर्माण झालेली रागाची भावना, हावभाव, कृती, प्रतिक्रियातून बाहेर प्रदर्शित होऊ नये यासाठी वापरात असेलली कांही टेकनिक्स-तंत्रे उदाहरणार्थ - १ ते १० आकडे मोजणे, दीर्घ श्र्वास घेणे, पाणी पिणे, दुरवर जाणे, शरीर सैल सोडणे, विषयांतर करणे, कांहीही न बोलता खाली मान घालून गप्प बसणे, डोळे मिटणे, आलेला राग लिहून काढणे इत्यादिंचा वापर करून मनातील रागाची भावना बाहेर न दाखविण्यात मला कधी यश मिळाले तर कधी अपयश. कधी-कधी माझ्या रागाचा आवेग इतका प्रचंड असायचा की, रागाला आवरण्यासाठी तंत्राच्या वापर करण्याचे मला सुचण्यापूर्वीच मनातील राग एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे वेगाने बाहेर पडायचा. कालांतराने मला जाणवले की, तंत्राचा वापराने आवरलेला, बाहेर व्यक्त न झालेला राग मनात साठून राहातो आणि नंतर दुसऱ्याच कुठल्यातरी क्षुल्लक कारणावरून मूळ रागापेक्षा जास्त धोकादायक, अपायकारक बनून एखाद्या स्फोटाप्रमाणे बाहेर पडून माझे जास्त नुकसान करतो.

या वरून माझ्या लक्षात आले की, रागाला आवरण्याची टेकनिक्स-तंत्रे ही वास्तवामध्ये रागाची भावना बाहेर प्रदर्शित करणाऱ्या हावभावांना, कृती, प्रतिक्रियांना आवरणारी, रोखणारी तंत्रे-टेकनिक्स आहेत, जी मनात राग उत्पन्न होण्यास, मनामध्ये रागाचे मूळ कारण असलेल्या अयोग्य, चुकीच्या, नकारार्थी विचारांना नष्ट करण्यात उपयोगी होत नाहीत. 
 
मनाची राग विरहीत स्थिती - राग भावनेला बाहेर प्रदर्शित होण्यास आवर घालणाऱ्या तंत्रांच्या मर्यादातून माझ्या लक्षात आले की, रागाच्या दुष्परिणामाला टाळायचे असेल तर मनातील चुकीचे, नकारार्थी, कुविचार ओळखून त्यांना नियंत्रित व दुर्बल करून नष्ट करणे अत्यंत जरूरीचे व श्रेयस्कर आहे. परंतु मनाला, मनातील विचारांना नियंत्रित करणे, त्यांच्यावर ताबा मिळवणे महाकठीण काम आहे. 

१४ व्या शतकातील तामीळ संत, कवी थायुमानवर म्हणतात, “हत्तीला नियंत्रित करणे, वाघाची शेपूट धरून ठेवणे, सापाला पकडून नाचणे, देवदूतांना आज्ञा देणे, परकाया प्रवेश करणे, पाण्यावर चालणे किंवा समुद्रावर बसणे हे एखादे वेळी सोपे आहे; पण मनावर ताबा ठेवणे आणि शांत राहणे हे त्याहून अधिक कठीण आहे.”  

मनाला, मनातील विचारांना शांत करून नियंत्रित करण्यासाठी फार पुर्वीच्या काळापासुन ऋषी-मुनीं, साधु-संत-योग्यांनी व आजच्या मानसशास्त्रज्ञ-तज्ज्ञांनी योगसाधनेचा व आत्मनिरीक्षण, आत्मविश्लेषण तंत्राचा आणि त्यांना पुरक मंत्रजप, नामस्मरण, होकारार्थी-शक्तीदायक सुवचनांचे पठण, उच्चारणाचा मार्ग अवलंब करण्यास सुचविले आहे. या मार्गाचे नियमीत आचरण केल्याने मन, मनातील विचार शांत होतात. भीती, वेदना, निराशा, ताण-तणाव, अन्याय, अहंकार, अपमान, नुकसान, स्वार्थ, लोभ,... अशा नकारार्थी, वाईट, हानीकारक, अयोग्य विचार नियंत्रित, दुर्बल व नष्ट होतात. मनामध्ये प्रेम, दया, माया, क्षमा, करूणा, ममता, सहनशीलता, समजुतदारपणा... यासारखे होकारार्थी, चांगले, लाभदायक, योग्य सु-विचार जोपासले जातात.  
यातून हे लक्षात येते की, मनाची रागविरहीत स्थिती-धारणा होण्यासाठी योगसाधना, आत्मनिरीक्षण, आत्मविश्लेषण, व मंत्रजपादी मार्गाचा दैनंदिन जीवनात नियमीतपणे अवलंब केला असता मनाची रागविरहीत स्थिती-धारणा होण्यास मदत होऊ शकते. 

रागाचे परिणाम - रागाचे फक्त दुष्परिणाम असतात. माझ्या रागीट स्वभावामुळे झालेल्या माझ्या नुकसानीचे, दुःखाचे, त्रासाचे वर्णन लेखाच्या सुरवातीला मी केले आहे. सर्व ऋषी-मुनी, साधु, संत, महात्मे राग माणसाचा सर्वात मोठा शत्रु असल्याचे सांगतात. 

एक अमेरिकन धार्मिक नेते, लेखक थॉमस स्पेन्सर मॉन्सन सांगतात, 
“राग कांही सोडवत नाही, तो कांही निर्माण करत नाही, पण तो प्रत्येक गोष्ट नष्ट करू शकतो ”.

राग माणसाच्या मनातील सहनशिलता, समजुतदारपणा, प्रेम, दया, माया, क्षमा, करूणा, ममता अशा निसर्गदत्त भावनांना नष्ट करून त्याचे क्रुर, निर्दयी, निष्ठुर, हीन पशुमध्ये रूपांतर करतो. चौथ्या शतकातील एक संत ऑगस्टीन म्हणतात, 
“क्रोध हे तण आहे; द्वेष हे झाड आहे.” राग माणसाच्या मनामध्ये द्वेष, तिरस्कार, सूडाची बीजे पेरतो. त्याला घातक, आक्रमक, हानीकारक, विध्वंसकारी, हिंसक कृत्ये करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे रागाचे दुष्परिणाम राग आलेल्या व्यक्ति बरोबर इतरांनाही भोगावे लागतात. याचा परिणाम राग समाजात सर्वत्र महामारीप्रमाणे पसरण्यात आणि समाजात तेढ, असुरक्षितता, द्वेष, तिरस्कार, सूड, अशांतता, वाद-तंटा, भांडण, दंग्याचे वातावरण निर्माण करण्यास कारण होतो.   

समारोप - श्रीसमर्थ रामदास स्वामी उपदेश करतात, “नको रे मना क्रोध हा खेदकारी”. क्रोध-राग हा खेदास-दुःखास कारण असतो त्यामुळे मनामध्ये क्रोध नसावा, मनाची स्थिती-धारणा क्रोध-रागविरहीत व शांत असावी. 
सर्वांच्या मनाची रागविरहीत स्थिती होण्यासाठी, सर्वांचे जीवन सुखी, आनंदी, सौहार्दपूर्ण, सुसंवादी, होण्यासाठी या लेखाची सांगता शान्तिमंत्राने करीत आहे. 
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । 
मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ 
सगळे सुखी होवो, सगळे रोगमुक्त राहो, सगळे चांगल्या, मंगल घटनांचे साक्षीदार होवोत, आणि कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये, असे वरदान हे परमेश्वरा, आम्हाला दे !
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥