Sangli Samachar

The Janshakti News

पर्वराज पर्यूषण पर्व जैन समाजाचा पवित्र सण - प्रा. एन. डी. बिरनाळे



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ सप्टेंबर २०२४
पर्वराज पर्यूषण पर्व जैनांचा पवित्र सण..! पर्व म्हणजे पवित्र करणारा. यालाच दशलक्षण पर्व असे म्हणतात. हा पर्व दरवर्षी भाद्रपद शुध्द पंचमीपासून चतुर्दशी पर्यंत असतो. या दिवसात श्रावक श्राविका दररोज जिन मंदिरात जाऊन तीर्थंकर पूजन व तत्वार्थ सूत्र या ग्रंथाचे वाचन करतात. आचार्यश्री कुंदकुंदाचार्य यांचे शिष्य आचार्य उमास्वामी यांनी हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. या ग्रंथाला मोक्षशास्त्र म्हणतात कारण या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या सूत्रात मोक्षमार्गाचे वर्णन केले आहे व शेवटच्या अध्यायाच्या दुसऱ्या सूत्रात मोक्षस्वरुपाचे वर्णन केले आहे. या ग्रंथात भ. महावीरांच्या दिव्य ध्वनीचे सूत्ररुपाने वर्णन आहे. 

हिंदूंना भगवतगीता, ख्रिश्चनांना बायबल, मुस्लिमांना कुराण, बौध्दांना धम्मपद तसे जैनांना तत्वार्थ सूत्र म्हणजे मोक्षशास्त्र नमस्कार मुख्य ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या ९व्या अध्यायाच्या सूत्र क्र. ६ मध्ये 'उत्तम क्षमा - मार्दव - आर्जव-शौच-सत्य-संयम - तपः - त्याग - अकिंचन्य - ब्रम्हचर्यणि धर्मः अशी जैन धर्माची दहा अंगे म्हणजे सद्गुणं सांगितली आहेत. 


१)उत्तम क्षमा धर्म :कितीही विपरीत परिस्थिती आली तरी क्रोध राग उत्पन्न होऊ न देणे म्हणजे क्षमा धर्म. क्षमा माणसाला महान बनवते तर क्रोध लहान बनवते. क्षमा धारण करणारा मुक्तीचा मानकरी होतो. भ. पार्श्वनाथांचे उदाहरण हे या धर्माचे सर्वोच्च उदाहरण आहे. कमठाने अनेक भवात कितीही उपसर्ग केले तरी त्यांना क्रोध आला नाही. ते मोक्षगामी झाले व कमठ नरकात गेला. 

२) उत्तम मार्दव धर्म :जाती, कुल, रुप, ज्ञान व संपत्तीचा गर्व न करणे, मधूर बोलणे, मी पणा गळून पडणे म्हणजे मार्दव धर्म.  

३) उत्तम आर्जव धर्म :मन, वचन व कायेनी कपट न करणे, वाणी व करणीत एकवाक्यता म्हणजे आर्जव धर्म. 

४) उत्तम शौच धर्म :जीवित, आरोग्य, इंद्रीय व भोग्य सामग्री इ. चा लोभ न करणे. अंतर्बाह्य शूचिर्भूतता म्हणजे शौच धर्म. 

५) उत्तम सत्य धर्म : सज्जन पुरुषासह हित मिता प्रिय बोलणे. दुसऱ्याचे अहित करणारे सत्य देखील बोलणे नाही. असत्य बोलणे टाळणे म्हणजे सत्य धर्म. 

६) उत्तम संयम :पृथ्वीतलावरील कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांना, किटकांना पिडा न करणे व पंचेंद्रियांच्या आहारी न जाता इंद्रीये ताब्यात ठेवणे म्हणजेच संयम धर्म. 

७) उत्तम तप धर्म : कर्मक्षयासाठी अंतरंग व बहिरंग १२ प्रकारचे तप करुन शरिराला तापवून आत्मप्रदेश स्वच्छ करणे म्हणजे तप धर्म. 

८) उत्तम त्याग धर्म :चेतन अचेतन परिग्रह त्यागणे म्हणजे त्याग धर्म. यामध्ये ममत्व भाव त्यागणे अपेक्षित आहे. 

९) उत्तम अकिंचन्य धर्म :या जगात माझ्या शरिरासह यत्किंचितही माझे काही नाही. पैसा- अडका, गाडी - बंगला, जमीन-जुमला, नाती - गोती यापैकी माझे कांहीच नाही. यावरील ममत्व त्याग म्हणजे अकिंचन्य धर्म. 

१०) उत्तम ब्रम्हचर्य धर्म : बाह्यता स्त्रीमात्राचा त्याग करून स्वसंतोषदार व्रताचे पालन करुन ब्रम्ह म्हणजे आत्मा व चर्य म्हणजे आचरण म्हणजे आत्मा व आत्मस्वरुपात लीन होणे म्हणजे ब्रम्हचर्य धर्म. 

या दशधर्माचा सन्मान मोंगल बादशहा सुध्दा करीत असे. सम्राट अकबराने पर्यूषण पर्वात हिंसा बंदीचे फर्मान काढले होते.दशधर्म पालनाने कर्मक्षय होऊन मुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो एवढे मात्र निश्चित..! 

प्रा. एन.डी.बिरनाळे, सांगली.