| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ सप्टेंबर २०२४
तोट्याच्या दलदलीत फसलेल्या एसटीला बाहेर काढण्यासाठी महामंडळ वेगवेगळे मार्ग शोधत असते. मध्यंतरी 50% सवलत देऊन महिला वर्गाला लालपरीकडे वळवले होते. याचा चांगला फायदा दिसून आला. त्यानंतर 65 वर्षावरील पुरुषांना 50 टक्के तर 70 वर्षावरील पुरुषाला मोफत प्रवास योजना राबविण्यात आली. यातूनही महामंडळाला पैसे कमवता आले.
आता एस टी महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी एक नवीन योजना आणली असून, त्यातून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात ही योजना फक्त चालक वाहकांसाठीच आहे. एकीकडे विविध सवलतीच्या योजनातून प्रवाशांना एसटीकडे वळवण्याचा प्रयत्न असताना चालक वाहक दुर्लक्ष करीत असल्याचे तक्रार होती. बसमध्ये जागा असतानाही, प्रवाशांसाठी न थांबणे, प्रवाशांशी वाद घालणे, यासह जुनाट बसेस मुळे लाल परी रस्त्यात कधीही रुसून बसणे, प्रवासात बसचा खडखडाट, फाटलेल्या सीट्स यामुळे प्रवासी पासून दूर चालला होता.
या दूर वेळेला प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळवणे मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलत असताना, विविध योजनांच्या माध्यमातून प्रवाशांना सवलत देण्याचा मार्ग अवलंबण्यात आला. आता नव्या योजनेनुसार चालक वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित 'प्रोत्साहन भत्ता योजना' महामंडळाने जाहीर केली आहे. याबाबतची माहिती राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पाठवण्यात आली असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी देण्यात आली आहे.
अशी आहे योजना
२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या ३० दिवसांच्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर महामंडळाकडून ही योजना राबविली जाणार आहे. या दिवसांतील प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाची गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर) प्रत्येक दिवसाच्या उत्पन्नाची तुलना केली जाईल. त्यानंतर गेल्या वर्षी या कालावधीत किती उत्पन्न होते आणि त्यापेक्षा किती जास्त उत्पन्न यावेळी मिळाले, त्या आकड्यांचा हिशेब केला जाईल.
चालक, वाहकांना २० टक्के रक्कम
प्रत्येक आगाराचे लेखाकार आणि सहायक वाहतूक अधीक्षक आर्थिक ताळेबंद काढून रक्कम तपासतील. त्यानंतर गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा जेवढी जास्त (अतिरिक्त) रक्कम मिळाली, त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक, वाहकांना (१० - १० टक्के) विभागून दिली जाईल.