| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ सप्टेंबर २०२४
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयी भाष्य केल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. विदेशात जाऊन सातत्याने येथील नागरिकांची व लोकप्रतिनिधींची बदनामी करणे, परदेशात जाऊन मनाला येईल ते बोलणे एका जबाबदार लोकप्रतिनिधी झाला शोभत नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी नुकतेच अमेरिकेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना, योग्य वेळ येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, सध्या ती वेळ नाही असे म्हटले होते. यावरून शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पुढे म्हणले की, आरक्षण संपवण्याविषयी परदेशातील व्यासपीठावरून बोलणे अत्यंत दुर्दैवी आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष आरक्षणाबाबत सकारात्मक असून, कोणत्याही परिस्थितीत आरक्षण संपवण्याबाबत आम्ही पाऊल उचलणार नाही. उलट जो कोणी आरक्षण संपवण्याबाबत भाष्य करणार असेल, किंवा तसा प्रयत्न करत असेल तर महायुती त्याला कडाडून विरोध करेल असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी हे परकीय मानसिकतेचे असून यापूर्वीही त्यांनी विविध देशात जाऊन भारताविषयी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. भारतीय विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत देशाचा झेंडा परदेशी फडकवला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य हे अशा विद्यार्थ्यांची मानहानी करण्यासारखे आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान राहुल गांधी यांच्या आरक्षणाविषयी केलेल्या भाष्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देश विरोधी बोलणे आणि देशाला तोडणाऱ्यांच्या बरोबरीने उभे राहणे हे राहुल गांधी व काँग्रेसची सवय असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. तर आरक्षण संपवण्याचे भाषा करणाऱ्या खरा चेहरा या निमित्याने जनतेसमोर आला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.