| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ सप्टेंबर २०२४
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची, माजी खासदार व जिल्ह्यातील भाजप नेते संजय पाटील यांनी काल पुण्यातील मोतीबाग या निवासस्थानी भेट घेतल्याने सांगलीचे राजकारण ढवळून निघाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांचा पराभवास जबाबदार असलेल्या भाजपामधील स्थानिक नेत्यांवर असल्याची चर्चा होती. तशातच तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघातून त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत, या पार्श्वभूमीवर शरद पवार-संजय पाटील यांची भेट चर्चेचा विषय बनले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय पाटील यांच्या विरोधात उघड उघड प्रचार केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांची भूमिका प्रभाकर पाटील यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच माझे खासदार संजय पाटील यांनी मा. शरद पवार यांची भेट घेतली आहे का, असे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. परंतु संजय पाटील यांनी याबाबत खुलासा केल्याने, सर्वच राजकीय चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
आपल्या शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना संजय पाटील म्हणाले की, सांगली येथील मराठा समाज सांस्कृतिक भवन मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा 4 ऑक्टोंबर रोजी सांगलीत होणार आहे. मी या कार्यक्रमाचा स्वागत अध्यक्ष असून, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठीच आदरणीय शरद पवार यांना भेटलो आहे. या भेटीत आपली राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे संजय पाटील याने म्हटले आहे. त्यामुळे शरद पवार व संजय पाटील यांच्या भेटीने उठलेली राजकीय राळ खाली बसणार आहे.