| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ सप्टेंबर २०२४
लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागलेल्या 40 जागांवरून मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेल्या अनेक मतदार संघामध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी दावा सांगितला आहे. यावरूनच आता महायुतीचा रणसंग्राम पहावयास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पराभूत झाले होते, त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाच वर्षे विविध कार्यक्रमातून 'मत पेरणी' केली आहे, या पराभूत उमेदवारांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. परंतु अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदल करण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांना बरोबर घेतले. हे कमी की काय म्हणून वर्षभरापूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादीतील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले. आता हेच शिंदे गटाचे व अजित पवार गटाचे आमदार, महाराष्ट्रातील ४० विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यावर पाणी फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्याप जागावाटप किंवा उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी, या मतदारसंघातून तिन्ही पक्षांतील इच्छुकांच्या कोणाला तिलांजली मिळणार आणि कोण या विरोधात बंडाचा झेंडा खांद्यावर घेणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक महायुती आणि महाआघाडी या दोन्हीसाठी अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या मत चाचणीवरून महाआघाडी की महायुती याबाबत चर्चा रंगल्या आहेत. अशातच इच्छुकांची नाराजी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते कसे दूर करतात, यावरून विधानसभा निवडणुकीतील विजयावर कोणता पक्ष स्वार होणार हे ठरणार आहे. त्यामुळे भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी संभाव्य वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यम मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत.
'जिथे ज्यांची ताकद जास्त तेथे त्या पक्षाचा उमेदवार' असा निर्णय महायुती आणि महाआघाडीने घेतला आहे. याच मुद्द्यावरून संभाव्य उमेदवारी ठरणार असल्याने, 'कोणत्या मतदारसंघात बलाढ्य उमेदवार कोण ?' हाच कळीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. तिन्ही पक्षातील नेत्याच यावरून एकमत झाले तरी, संभाव्य उमेदवाराविरोधात इतर इच्छुक उमेदवार काय भूमिका घेतात ? याकडे सर्वच मतदारसंघातील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. आणि हाच सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.