| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १६ सप्टेंबर २०२४
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाने कात टाकली असून, फेसबुक व्हाट्सअप, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया वरून मेसेज पाठवणे खूपच सोयीचे झाले आहे. हा मेसेज पाठवत असताना अनेक जण यामध्ये 'इमोजी'चा सहजतेने वापर करीत असतात. त्यामुळे मेसेजला एक वेगळाच लूक मिळत असतो. वाचणाऱ्यालाही त्यातून आनंद मिळतो.
या इमोजी मधील काही इमोजी आनंददायी सुंदर संदेश देणारे असतात. परंतु काही इमोजी मात्र द्विअर्थी किंवा संदिग्ध असतात. यातून मेसेज पाठवणाऱ्याचा नेमका संदेश किंवा मानसिकता लक्षात येतेच असे नाही. अशावेळी हा मेसेज वाचणाऱ्याच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो. कधी कधी वादही निर्माण होतात. त्यामुळे चुकीच्या व अयोग्य इमोजीमुळे वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊन प्रकरण विकोपाला जाऊ शकते.
कधी कधी काही व्यक्ती या इमोजी वापरून महिलांना व मुलींना त्रास देत असतात. यातून असुरक्षितता निर्माण होते. मध्यंतरी शासनाकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, या इमोजी वापराबाबत कायदेविषयक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. समाज माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण करणे हा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. संविधानात अधिनियम 19 अंतर्गत याबाबत उल्लेख पहावयास मिळतो. ज्याद्वारे नागरिकांचे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले जाते, परंतु याचा अधिकार मर्यादित आहे.
इमोजी पाठवत असताना समाजविघातक इमोजी देशाच्या हिताच्या दृष्टीने घातक आहेत. त्याचप्रमाणे कुणाच्या हितसंबंधास बाधा पोहोचल्यास अब्रू नुकसानीचा दावाही ठोकला जाऊ शकतो. म्हणजे देश विघातक किंवा समोरच्या व्यक्तीची भावना दुखावणारे इमोजी पाठवले गेल्यास आपण कायद्याच्या कसोट्यात येऊ शकतो. हे टाळायचे असेल तर यापुढे इमोजी पाठवत असताना, त्या इमोजीतून देशविरोधी किंवा समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, त्यातून अप्रत्यक्षरित्या लैंगिक संदेश दिला जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली जाणे क्रमप्राप्त ठरणार आहे.