Sangli Samachar

The Janshakti News

जोपसण्या सवयीं चांगल्या.... (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३ सप्टेंबर २०२४
कांही वर्षांपुर्वी माझे दैनंदिन जीवन खूप विस्कळीत व अनियंत्रित होते. कुठेही वेळेवर पोहचण्यास मला नेहमी उशीर होत असे. रात्री माझ्या अंगावर पित्ताच्या गांध्या उठून त्यांची प्रचंड खाज सुटायची. शिवाय अपचन, करपट ढेकरा, बद्धकोष्ट, मूळव्याधी यांचा त्रास व्हायचा. माझ्या या दुरावस्थेचे कारण माझ्या वाईट सवयीं हे होते. कितीतरी वर्षे ही परिस्थिती तशीच होती. पण आता हे सांगतांना मला आनंद होतो आहे की, माझ्या कांही वाईट सवयीं पूर्णपणे सोडविण्यात मला यश मिळाले आहे. त्यामुळे आता मी नियोजित ठिकाणी वेळेत पोहचतो-पोहचू शकतो. माझा पित्ताचा, अपचनाचा त्रास पूर्णपणे थांबला आहे, आणि बद्धकोष्ठ, मूळव्याधीचा त्रास क्वचित उद्भवतो. याचा परिणाम आजचे माझे जीवन बरेचसे सुरळीत व समतोल होण्यात झाले आहे.

हे मी नमुद करण्यामागे माझी स्वतःची प्रौढी मिरवणे हा उद्देश नाही. माझ्या उदाहरणावरून इतरांना प्रोत्साहन मिळावे व ज्या संभाव्य चुका-अडथळ्यांच्यामुळे वाईट सवय सोडण्यात कधी-कधी अपयश येते, ते मुद्दे यादी इतरांना त्यांच्या फायद्यासाठी सांगावेत या उद्देशाने हा लेखन प्रपंच. हे सर्व मुद्दे, माहिती प्रत्येकाला सर्व प्रकारच्या वाईट सवयीं सोडण्यासाठी उपयोगी होतील असे नाही पण, त्यातील कांही मुद्दे तरी उपयोगी पडतील अशी मला आशा आहे.

१) सवय म्हणजे काय ?
सर्वात प्रथम सवय म्हणजे काय हे सविस्तरपणे समजाऊन घ्यावे. सवय म्हणजे एखादी व्यक्ती नियमितपणे व जे वारंवार करते, वागते त्याचा एक सामान्य मार्ग, असे कांहीतरी*. याचप्रमाणे, सवय म्हणजे आपले पूर्वीचे विचार, इच्छा किंवा भावना यांचा आपल्याला आलेला मानसिक अनुभव पुन्हा वारंवार मिळण्यासाठी जाणीवपूर्वक किंवा आजाणतेपणे केलेली कृती.-$ थोडक्यात सवय म्हणजे मनात खोलवर रूजलेल्या विचारांचे दृश्य रूप होय. (संदर्भः *मेरियम वेवस्टर डिक्शनरी, $Habit - Wikipedia


२) सवयी मित्र कि शत्रु ?
सवयीं चांगल्या व वाईट अशा दोन्ही प्रकारच्या असतात. चांगल्या सवयीं आपल्या मित्र असतात, तर वाईट सवयीं आपल्या शत्रू. जुनी वाईट सवयीं सोडणे आणि नवीन चांगली सवय जोपासणे दोन्हीही कठीण असते. कोणतीही नवीन चांगली सवय एका दिवसात लागत नाही आणि जुनी वाईट सवय एका दिवसात सुटत नाही. वाईट सवयीं पुन्हा-पुन्हा डोके वर काढत राहतात. ‘वाईट सवय मुंगीच्या पावलाने येते व हत्तीचे रूप धारण करते.‘ सवयींना आपला मित्र बनवायचे कि शत्रू हे आपणच ठरवायचे असते.

३) वर्तमान सवयींचा आढावा
आपल्या चांगल्या-वाईट सवयीं आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव करत असल्याने त्यांचा त्रयस्थ व नियमीतपणे आढावा घेणे आवश्यक आहे. ज्या वाईट सवयीं सोडायच्या आहेत व नव्या चांगल्या सवयीं जोपासायच्या आहेत त्यांची प्राध्यान्याप्रमाणे वर्गवारी करून त्यांची यादी तयार करावी. 

४) दृढ निश्चय व ठाम निर्णय
मन चंचल आहे, त्याच्या लहरीप्रमाणे माणसाला ते वागावयास भाग पाडते. त्यामुळे जी वाईट प्राधान्याने सवय सोडायची आहे, ती हानीकारक आहे, समस्यांचे कारण आहे हे मनावर ठसवून, ती सोडणारच असा ठाम निर्णय दृढ निश्चयाने घेणे खूप महत्वाचे आहे. कारण मनाचा चंचलपणा दृढ निश्चयात बाधा आणतो व ठाम निर्णय ढासळवतो. 
उदा. वरवर साधी दिसणारी उशीरा उठण्याची वाईट सवय मनाचा चंचलपणामुळे सुटता सुटत नाही. मन आधल्या रात्री दुस-या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा निश्चय करते, निर्णय घेते पण, सकाळी लवकर जाग आल्यावर, तेच मन कांहीतरी सबब, निमित्त पुढे करते आणि फिरून झोपण्यास उद्युक्त करते. असा अनुभव बऱ्याच लोकांना येतो. त्यामुळे जुनाट वाईट सवयींना कायमचे सोडण्यासाठी व त्या पुन्हा डोके वर काढू नयेत यासाठी, चंचल मन सांगत असलेल्या भ्रामक सबबींकडे दुर्लक्ष करून दृढ निश्चयाने ठाम निर्णयाप्रमाणे वागणे अत्यावश्यक आहे.  

५) वास्तवतेचे भान ठेवणे 
कोणतीही नवीन चांगली सवय जोपासण्याचा निर्णय घेतेवेळी वास्तव परिस्थितीचे भान ठेवणे गरजेचे आहे. उदा. बीपीओ, धाबा या सारख्या रात्री उशीरापर्यंत कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना पहाटे लवकर उठण्याची सवय जोपासण्याचा निर्णय अंमलात आणणे खुप कठीण असते.   

६)ध्येय विभाजन 
कोणतीही नवीन चांगली सवय एका दिवसात लागत नाही. ध्येय गाठण्यासाठी त्याचे लहान-लहान भाग करावे लागतात. समजा एका व्यक्तिला व्यायाम करण्याची सवय जोपासायची आहे. त्याने जर पहिल्याच दिवशी १०० जोर-बैठका मारल्या तर काय होईल ? दुसऱ्या दिवशी त्याला चालतासुद्धा येणार नाही व त्या नंतर व्यायामात खंड पडेल. परिणाम, व्यायाम करण्याची त्याची इच्छा एक स्वप्न बनेल. तेच जर त्याने सुरवातीस कांही दिवस १०-१५ जोर-बैठकांनी सुरवात केली व शरीराला व्यायामाची सवय लागेल त्याप्रमाणे त्यात वाढ केली तर तो दीर्घकाळ व्यायाम करू शकेल आणि त्याचे ध्येय त्याला साध्य होऊ शकेल.   

७) वाईट सवय कमकुवत करणे
उदा. ज्यांना चॉकलेट खायची सवय सोडायची आहे त्यांनी ती लगेच मिळणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत. चॉकलेट शोधण्यात वेळ गेला की ती खाण्याची उर्मी कमी होते. कालांतराने चॉकलेट खायची इच्छा दुर्बल होऊन, सवय सुटु शकते. 

८) चांगल्या सवयीला सहाय्यक कृती, व आनंदी-शक्तीशाली विचारांची जोड देणे
उदाहरणार्थ पहाटे लवकर उठण्याच्या सवयींला सहाय्यक म्हणून दररोज रात्री लवकर झोपी जाणे, रात्री भरपेट जेवण न घेता दोन घास कमी खाणे, झोपताना आनंदी-शक्तीशाली सकारात्मक विचारांची मनातल्या मनात उजळणी अश्या कृती लाभदायक ठरतात. 

९) स्वतःला बक्षिस देणे
चांगली सवयीं या स्वतःच बक्षीस आहेत पण, त्यांना दीर्घकाळासाठी सुरू ठेवण्यासाठी व आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यासाठी, एखादे छोटे-मोठे बक्षीस स्वतःच स्वतःला देणे फायदेशीर ठरते. 
उदा. अमुक एक सवय एकही दिवसाचा खंड न पडता सुरू ठेवल्यानंतर आवडत्या पुस्तकाची खरेदी, आवडीचे संगीत-गाणी ऐकणे, कॉफी पिणे, घरासाठी वस्तु-फर्निचर विकत घेणे, सेल्फी घेणे, सहलीला जाणे असे स्वतःला दिलेले बक्षिस, नवी चांगली सवय खंड न पडता दीर्घकाळ सुरू राहाते.    

१०) चांगल्या सवयीची मनाला सतत आठवण करून देणे
‘वाईट सवयीच्या शृंखला तोडण्यासाठी खूप जड होईपर्यंत खूप हलक्या वाटत असतात, हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे.’ - वॉरेन बफेट-
त्यामुळे मन चांगले निर्णय लवकर विसरते. हे लक्षात घेता नवीन चांगल्या सवयींचा निर्णय मनात सतत तेवत ठेवणे, तो दृढ करणे गरजेचे असते. यासाठी नवीन चांगली सवय व तिचे फायदे, आरसा, फ्रीज, कॉम्युटर टेबल अशा ठिकाणी नजरेला पडतील असे लावावेत. फोन, कॉम्युटरवरमधील रिमांयडर फंक्शन, ॲप यांचाही यासाठी उपयोग होतो. 

११) यश-अपयशाचा आढावा घेणे
नवीन चांगल्या सवयीप्रमाणे वागण्यास सुरूवात केल्यावर ठराविक कालावधीने ती जोपसण्यामध्ये आलेल्या यशापयशाचा आढावा घ्यावा. त्याचा फायदा, चुका सुधारण्यासाठी व अडथळ्यांना बाजूला करण्यासाठी होतो. 

चांगल्या सवयीं जोपासण्यासाठी व वाईट सवयीं सोडण्यासाठी हे कांही मुद्दे. आणि आता शेवटचा, पण अत्यंत महत्वाचा मुद्दाः वाईट सवयी सोडून चांगली सवय जोपासण्यास यश मिळावे यासाठी दररोज परमेश्वराची प्रार्थना करून त्याचे आशीर्वाद मागणे आवश्यक आहे. (लेखन आधार-२,३) 
परमेश्र्वर वेगवेगळ्या मार्गांनी, माध्यमाद्वारे, चांगल्या सवयी जोपसण्यासाठी आपल्याला मदत करत असतो याचा मला स्वतःला अनुभव आलेला आहे.-४
‘जोपसण्या चांगल्या सवयी…’ या लेखाची सुरूवात “माझ्या कांही वाईट सवयीं पूर्णपणे सोडण्यात मला यश मिळाले आहे.” असे सांगून झाली आहे. पण अजुनही माझ्या कांही जुन्या वाईट सवयीं सोडण्यात मला पूर्ण यश मिळालेले नाही आणि त्यात नव्या वाईट सवयींची भर पडली आहे. दररोज खोलवर ध्यान करणे, कठोर आत्मनिरीक्षण करणे, संयम बाळगणे, सर्वांशी समजूतदारपणे, प्रेमाने बोलणे-वागणे असे चांगले गुण-सवयीं जोपासणे म्हणावे तितके अजनही साधलेले नाही.  

या सर्वांचा विचार करून या लेखाचा शेवट अल्बर्ट आइन्स्टाइनच्या ‘तुम्ही यशस्वी माणूस बनण्याऐवजी मूल्ये असलेला माणूस तरी बना‘.-५ या सुवचनाने करत आहे. 
टीपाः 
१. मूळ इंग्रजी वचनः Chains of habit are too light to be felt until they are too heavy to be broken. - Warren Buffett
 २. “कोणत्याही महत्वाच्या गोष्टीचा निर्णय घेण्याआधी ईश्वराचे आशीर्वाद मागण्यासाठी तुम्ही निःस्तब्ध बसावे. त्या नंतर तुमच्या शक्तीमागे ईश्र्वराची शक्ती, तुमच्या मनामागे त्याचे मन, तुमच्या इच्छेमागे त्याची इच्छा उभी राहते.” - श्री श्री परमहंस योगानंद, “यशाची गुरूकिल्ली“ (‘ आध्यात्मिक रोजनिशी, ‘ १३ डिसेंबर, योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया, रांची, झारखंड, प्रकाशन)
३. ”उत्कृष्ट, अवघड काम होण्यासाठी जी अंतर्मनाची मदत लागते, ती देवच देऊ शकतो .... आपल्या निर्माणकर्त्याने आपल्या मनामध्ये या ज्या शक्ती (सृजनशक्ती) गुप्त स्वरूपात साठवणीत ठेवल्या आहेत त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्यांची जाणीव होते.” - ‘अग्निपंख ’, डॉ. ए पी जे अब्दूल कलाम, सहाय्यकः अरूण तिवारी, अनुवादः माधुरी शानभाग, राजहंस प्रकाशन, ISBN -81-7434-144-7
४. आर्थिक बचत करणे, दररोज व्यायाम करणे, शाकाहारी भोजन घेणे, सिग्रेट ओढणे पूर्ण बंद करणे, सकाळी लवकर उठणे अशा कांही चांगल्या सवयीं अंगी बाळगण्यात मला जे यश मिळाले त्या मागे, एका पुस्तिकेतील लेख, डॉक्टर मित्रांचा सल्ला, आणि एक अकल्पित घटना, कारणीभूत आहेत. 
५. मूळ इंग्रजी वचनः “Try not to become a man of success. Rather become a man of value.”―Albert Einstein
लेखनआधारः १) २६ डिसेंबर, २०२१ च्या इकॉनॉमिक टाईम्स, बेंगलोर मधील इंदुलेखा अरविंद यांचा लेख व त्यातील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची मानसशास्त्र, व्यवसाय प्रोफेसर, Good Habits: Bad Habits: The Science of Making Positive Changes या पुस्तकाची लेखिका वेंडी वुडच्या लिखाणातील कांही दाखले