| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १० सप्टेंबर २०२४
आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, ‘करावे तसे भरावे ‘. ज्याचा अर्थ सरळ, सोप्या, साध्या शब्दांमध्ये सांगायचा तर, मानसिक व शारिरीकरित्या जे जे कांही आपण करत असतो, त्याचे फळ म्हणजे परिणाम आपल्याला त्या त्या कृती, कर्म, क्रियाप्रमाणेच मिळत असते. आपल्या वागण्याचे, वर्तणुकीचे म्हणजे, क्रिया, कृती, कर्मांचे मूळ आपल्या मनामध्ये साठलेल्या विचारांमध्ये असते. श्री समर्थ रामदासस्वामी सांगतात, “जनीं सर्व सुखी असा कोण आहे । विचारें मना तूंचि शोधूनि पाहे।। मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें। तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ।।“ - (श्रीसमर्थ रामदास स्वामी - श्री मनाचे श्र्लोक - ११)
आपल्या मनामध्ये अनेक चांगले-वाईट, नकारात्मक-सकारात्मक विचार सुप्तपणे साठलेले असतात, ते बाहेर दिसत नसतात. कृती, कर्म, क्रिया-प्रतिक्रिया यातून जे बाहेर दिसते, त्या असतात भावना. मुख्य सहा भावना आहेत - आनंद, दुःख, तिरस्कार, भीती, आश्चर्य व राग. या भावना चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली-शारिरीक क्रिया व आवाजाच्या स्वरामधून प्रसंगानुरूप दृश्य रूपाने प्रगट होतात. भावना व विचार हे परस्परांशी संबंधीत आहेत. त्यामुळे आपण जे कांही करत असतो त्याचा संबध आपल्या मनात साठलेले, संचित झालेले विचार व भावना या दोन्हींशी असतो.-१
या सर्वाचा सारांश, सूत्र रूपात असा सांगता येईल - मनामध्ये चांगले विचार-भावनांचा संचय = चांगली कर्मे = चांगला परिणाम = सुख, आनंद. मनामध्ये वाईट विचार-भावनांचा संचय = वाईट कर्मे = वाईट परिणाम = दुःख, त्रास
मनात साठलेले विचार व प्रगट होणाऱ्या भावना, दैनंदिन जीवनातील आपल्या वागण्यावर, व्यवहारांवर, वर्तणुकीवर, आवडी-निवडीवर, कृती-क्रिया-प्रतिक्रियावर व समज आणि जाणीव या सगळ्यांवर प्रभाव टाकत असतात.
अमेरिकन पत्रकार, १२ लाखाहून विक्री व ३० भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या Eat, Pray, Love या पुस्तकाची लेखिका म्हणते, ”तुमच्या भावना तुमच्या विचारांचे गुलाम असतात, आणि तुम्ही तुमच्या भावनांचे गुलाम असतात.”
आपल्या क्रिया-प्रतिक्रिया ज्यांचे मूळ आपल्या विचार व भावनामध्ये असते, आपल्या जीवनातील सुख-दुःखाला कसे कारण होतात हे खालील झेन कथेतून समजते.
मार्ग स्वर्ग व नरकाचाः एक झेन कथा
एकदा एक दणकट, धष्टपुष्ट सामुराई-२ युद्ध जिंकून परत येत असतांना एका झेन गुरूकडे-३ गेला. त्यावेळी तो झेन गुरू डोळे मिटून ध्यान करत होता. त्या उतावळ्या व उद्धट सामुराईने आपल्या कर्कश आवाजात त्या झेन गुरूला विचारले,
”कोणता मार्ग स्वर्गाकडे जातो व कोणता मार्ग नरकाकडे जातो?”.
त्या झेन गुरूने डोळे न उघडता आपले ध्यान तसेच पुढे चालू ठेवले. हे पाहून त्या सामुराईने थोडया मोठ्या आवाजात आपला प्रश्न पुन्हा विचारला. तरीही त्या झेन गुरूने कांही उत्तर दिले नाही. सामुराईने तिस-यांदा खुप मोठ्या कर्कश आवाजात तोच प्रश्न फिरून एकदा विचारल्यावर झेन गुरूने आपले डोळे उघडले व सामुराईच्या चेह-याकडे तिरस्काराने पाहात तो म्हणाला,
“मूर्ख माणसा, तू कशाला माझ्या ध्यानामध्ये अडथळा आणत आहेस, तुझ्यासारख्या हलक्या, तिरस्करणीय, उद्विग्न, घाणेरड्या माणसाला मी कां म्हणून उत्तर द्यावे?”
सामुराईला झेन गुरूचे वागणे अपमानस्पद वाटले. त्याला खूप राग आला. त्याने आपल्या कमरेला बांधलेली तलवार उपसली व झेन गुरूचे मस्तक छाटण्यासाठी उगारली. त्यावर तो झेन गुरू क्रुद्ध सामुराईच्या नजरेला नजर भिडवत शांतपणे म्हणाला,
“हा मार्ग नरकाकडे जातो.”
झेन गुरूचे शब्द ऐकताच सामुराई खाडदिशी भानावर आला व जागच्या जागी स्तब्ध झाला. त्याला स्वतःचा मुर्खपणा समजला. आपल्याला सत्य समजण्यासाठी झेन गुरूने आपला जीव धोक्यात घालून मुद्दामच कटु शब्दांचा वापर केला होता हे सामुराईला कळून चुकले. त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले. आपली तलवार त्याने म्यान केली. झेन गुरूने सत्य समजण्याची अंतर्दृष्टी आपल्याला दिली हे त्याने जाणले. कृतज्ञतेने, आदराने हात जोडून त्याने झेन गुरूला नमस्कार केला. झेन गुरूने प्रेमळ दृष्टीने सामुराईच्या नमस्काराचा स्विकार केला आणि तो उद्गारला, “हा मार्ग स्वर्गाकडे जातो.’
या झेन कथेचे तात्पर्य व बोधः
१) स्वर्ग म्हणजे सुख, आनंद आणि नरक म्हणजे दुःख, त्रास.
२) मनामध्ये चांगले, वाईट विचार व भावना दोन्ही असतात. त्यातील जो विचार, जी भावना बलवान असते ती कृतीच्या रूपाने बाहेर येते, पण वाईट विचारांचे प्राबल्य अधिक असते.
३) उतावळेपणा, उद्धटपणा, क्रोध अशा वाईट विचार-भावनापोटी केलेल्या कृती दुःख-त्रास, आणि विनम्रता, कृतज्ञता अशा चांगल्या विचारा-भावनापोटी केलेल्या कृती सुख-आनंद देतात.
४) मनातील वाईट विचार, भावनांचा प्रभावाखाली होणारी चुकीच्या कृतीची जाणीव, ती कृती टाळण्यास, नियंत्रित करण्यास मदत करते.
या झेन कथेमध्ये वर्णन केलेल्या घटनां, प्रसंगाप्रमाणे कितीतरी प्रसंग, घटना आपल्या दैनंदिन जीवनात, आजुबाजुला नेहमी घडत असतात. त्यावर आपण चांगल्या-वाईट क्रिया-प्रतिक्रिया, भावना प्रदर्शित करत असतो. आपल्या या वर्तणुकीचे, वागण्याचे फळ आपल्याला कधी तात्काळ, तर कधी कांही कालावधीने मिळते, पण मिळते हे नक्की. वाईट क्रिया-प्रतिक्रिया, भावनांचा परिणाम आपले नुकसान, हानी होण्यात आणि कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, सहकारी यांच्याशी संबंध बिघडण्यात होतो.
झेन कथेमधील सामुराई नशीबवान होता. झेन गुरूंच्या शब्दांमुळे तो भानावर आला. आपल्या वाईट विचारांना, भावनांना ओळखून त्यावर नियंत्रण करू शकला, त्यांना टाळू शकला. परंतु आपल्या दररोजच्या वास्तव जीवनात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, वेळेत भानावर आणण्यासाठी, सत्य समजण्याची अंतर्दृष्टी देण्यासाठी आपल्या जवळ काय आहे, कांहीही नाही. त्यामुळे आपल्या रोजच्या व्यवहारात आपण खुपदा वाईट, चुकीचे वागतो. कांही वेळेस आपण तसे कां वागतो, हे ही आपल्याला कळत नाही. पण, आपल्या वाईट कृतीचे वाईट फळ आपल्याला मिळते. आपल्याला दुःख होते. त्रास होतो. कालांतराने आपल्या वागण्याचा आपल्याला पश्चातापही होतो, पण वेळ निघून गेलेली असते.
या सगळ्या विवरणाचा विचार करता हे समजून येते की, वाईट विचार-भावना, कृतींना ओळखून व वेळीच सावध होऊन त्यांना नियंत्रित करण्यासाठी, सत्य समजण्याची अंतर्दृष्टी जागृत होणे गरजेचे आहे. बहुसंख्य लोक आत्मनिरीक्षण, स्व-विश्लेषण, अंतर्मुखता, Personal SWOT analysis अशी वेगवेगळी नांवे असलेल्या प्रक्रीयेचा, खरं तर कलेचा, वापर यासाठी करतात.
आत्मनिरीक्षणाच्या वेगवेगळ्या तंत्रांची माहिती देणारे पुष्कळ साहित्य पुस्तक, लेख, शोध-अभ्यासाच्या माध्यमातून बाजारामध्ये व इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यातील आपल्याला जे योग्य वाटेल, उपयुक्त वाटेल त्याचा वापर प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार करावा व आपले जीवन सुखी-आनंदी करावे.
संदर्भः १. https://www.verywellmind.com/an-overview-of-the-types-of-emotions-4163976#),
२. सामुराई- जपानी योद्धा संदर्भः https://www.britinia.com
३. झेन गुरू - महायान बौद्ध धर्मातील एका पंथाचे गुरू