| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० सप्टेंबर २०२४
निवृत्तीनंतरचे वय खरे तर आरामाचे, कुटुंब कबिल्यात रमण्याचे किंवा मग पर्यटनाच्या निमित्ताने फिरण्याचे. परंतु समाजात काही अशी वयस्कर व्यक्ती असतात, जे आपल्या अनुभवाचा लाभ निवृत्तीनंतरही समाजाला देण्यात अग्रेसर असतात. यापैकीच एक नाव म्हणजे विजयकुमार दिवाण. जलसंपदा विभागातून उपअभियंता पदावरून निवृत्त झाल्यानंतर, दिवाण यांनी आपले संपूर्ण आयुष्य पर्यावरणाच्या रक्षणासाठी वेचण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने त्यांचे वाटचाल सुरू आहे.
त्यांचे आणखी एक उल्लेखनीय कार्य म्हणजे, कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीच्या माध्यमातून कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व धरण प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी समन्वय साधत, महापूर नियंत्रित करण्यासाठीचे महत्त्वाचे योगदान. 2019 च्या प्रलयंकारी महापुराने उध्वस्त झालेल्या सांगली कोल्हापूर भागाला पुन्हा या दुःखद अनुभवातून जावे लागू नये म्हणून, सांगली कोल्हापूर भागातील समाजसेवी संस्था व व अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र व कर्नाटक शासनावर दबाव आणण्यासाठी निर्माण केलेला दबाव गट आणि प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून वेळोवेळी इशारा. हे महापूर नियंत्रणासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
याशिवाय इतरही अनेक उपक्रमात विजयकुमार दिवाण यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. याची दखल घेऊनच, सांगली येथील महात्मा गांधी ग्रंथालयास 107 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महात्मा गांधी ग्रंथालय ही साहित्यिक क्षेत्रातील उत्तुंग संस्था आहे. सांगलीचा तो सांस्कृतिक मानदंड मानण्यात येतो. 1916 मध्ये स्थापन झालेल्या या ग्रंथालयास राष्ट्रपिता महात्मा गांधी, यांच्यासह लोकमान्य टिळक देश-विदेशातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
ग्रंथालयातर्फे 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हा सन्मान सोहळा संपन्न होणार असून, पुरस्कार मिळालेल्या इतर मान्यवरांमध्ये साहित्यिक प्रा. सुभाष कवडे, इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर, डॉ. कुमार पाटील, उद्योजक गोपाळ मर्दा यांचाही समावेश आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक मेहता यांनी केले आहे.