| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० सप्टेंबर २०२४
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही २६ नोव्हेंबरच्या आत होईल असे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने कंबर कसली असून. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरच्या आत पार पडेल असं शरद पवार म्हटले आहे. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार तीन नेत्यांना असेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
"आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यासाठी समिती तयार केली आहे. ही समिती प्रत्येक तालुक्यांत जाऊन सव्ह करणार आहे. त्यानंतर जे लोक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, त्यांच्याबाबत लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो ओरिजनल इच्छुक आहे त्याला काही विचारलं जाणार नाही. सामान्य माणसांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. तसंच दूध संस्था, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मतं ही समिती घेईल. त्यानंतर उमेदवार ठरवला जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले या तिघांकडे असतील. या तिघांची समिती उमेदवारांबाबत माहिती घेईल, लोकांचा कल जाणून घेईल. त्यानंतर उमेदवार ठरवले जातील. येत्या ८ ते १० दिवसांत या गोष्टी आम्हाला संपवायच्या आहेत. जी समिती आम्ही नेमली आहे ती त्यांचं म्हणणं मांडेल त्यानंतर उमेदवाराचा निर्णय घेतला जाईल. प्रत्येकाला वाटतं हा मतदारसंघ आपलाच आहे. आघाडी म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. असं शरद पवार म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली असून. त्यांनी राजकीय पक्षांशी चर्चा केली आहे. माझा अंदाज आहे की ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. त्याच दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जातील. साधारण १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला.