Sangli Samachar

The Janshakti News

विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी सांगलीतील प्रसिद्ध हांडे पाटील तालीम मल्लांचे निवड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ सप्टेंबर २०२४
सांगलीला मोठी कुस्ती परंपरा आहे. हिंदकेसरी स्व. पै. मारुती माने, स्व. विष्णुपंत सावर्डेकर, बिजलीमल्ल स्व. पै. संभाजीराव पवार, अशा अनेक नावांची मांदियाळी येथे दिसून येते. या मल्लांना तयार करण्याची जबाबदारी ज्या तालीमीवर आहे अशा हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या तालमीमध्ये हांडे-पाटील तालमीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शतकोत्तर रोप्य महोत्सवी हांडे पाटील तालमीच्या अनेक मल्लांनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात, किंबहुना संपूर्ण देशात गाजवले आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली येथील वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत हांडे पाटील तालमीतील पहिलवानांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांना तालमीचे अध्यक्ष सुजित हांडे पाटील, वस्ताद अमोल खंदाळे, वस्ताद शशिकांत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्र शासकीय शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत हांडे पाटील तालमीच्या पहिलवानांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


निवड झालेल्यांमध्ये पै. आदित्य माने (80 किलो प्रथम), पै. श्रीजीत पवार (71 किलो वजन गटात प्रथम), पण वेदांत गंगधर (65 किलो गटात प्रथम), पै. संस्कार वळवडे (60 किलो गटात प्रथम), पै. फुरकान परांडे (55 किलो गटात प्रथम), पै. केदार सुतार (48 किलो गटात प्रथम), यांची निवड झाली तर ग्रीको रोमन प्रकारामध्ये पै पार्थ जगदाळे (८० किलो गटात प्रथम), व सुजल पवार (६० किलो गटात द्वितीय), पै. वरद मुळे (51 किलो गटात द्वितीय), पै. अमोल पाटील (45 किलो गटात प्रथम), त्याचप्रमाणे ओंकार खेत्रे यांनी 19 वर्षाखालील 71 किलो गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हांडे पाटील तालीमीचे नाव उज्वल करण्याच्या जिद्दीने हे सर्व बाल पैलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरल्याचे दिसून आले. आता महापालिका क्षेत्र शासकीय शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत हांडे पाटील तालमीचा नावलौकिक अधिक दृढ करण्याचा पक्का इरादा, तालमीचे अध्यक्ष सुजित हांडे पाटील यांच्यासह, वस्ताद अमोल खंबाळे व वस्ताद शशिकांत कुंभार यांनी व सर्व विजेत्या पैलवानांनी केला आहे. दरम्यान या विजेत्या पैलवानांचे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.