Sangli Samachar

The Janshakti News

महापालिकेकडून आज शाडू माती पासून गणेशमूर्ती तयार करण्याची मोफत कार्यशाळा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ सप्टेंबर २०२४
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव 2024 च्या पार्श्वभूमीवर शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त वैभव साबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारा दिली आहे.

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, या उद्देशाने आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नियोजनानुसार महापालिकेकडून या गणेशोत्सवामध्ये अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत. त्यातीलच पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव 2024 शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचा उपक्रम महापालिका हाती घेतला आहे. शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची मोफत कार्यशाळा महापालिकेने सर्वांसाठी आयोजित केली आहे. 


ही कार्यशाळा मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत आमराई उद्यान सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांनी आपल्या सोबत हात पुसण्यासाठी कापड एक लाकडी पाठ किंवा फळी आणि माती भिजवण्यासाठी पसरट भांडे सोबत आणायचे आहे. सहभागी सर्वांना महापालिकेकडून शाडूचीमाती पुरवली जाईल. सदर कार्यशाळेत कोणीही विद्यार्थी किंवा नागरिक प्रत्यक्षात सहभागी होऊ शकतो ही कार्यशाळा सर्वांसाठी मोफत आहे. तसेच आपण महापालिकेच्या एसएमकेसी.सांगली या फेसबुक पेजवरून सुद्धा लाईव्ह या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकता. कार्यशाळेत तयार करण्यात येणारी मूर्ती ही मूर्ती तयार करणाऱ्यांनाच दिली जाणार आहे. त्यामुळे शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा असे आवाहनही उपायुक्त वैभव सावळे यांनी केले आहे.