Sangli Samachar

The Janshakti News

आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी आ. सतेज पाटील यांचे गुपित उघड करीत मानले आभार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ सप्टेंबर २०२४
सांगली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाआघाडीतील वाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिटण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. मध्यंतरी खा. विशाल पाटील यांनी, विधानसभा निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांच्या पाठीशी राहण्याचे संकेत देताच, झोपत असलेला वाद पुन्हा पेटला. त्यावर समझोत्याचे पाणी मारून भिजवण्याचा प्रयत्न होत असतानाच, खा. विशाल पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी या वादाला पुन्हा फोडणी दिली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

कसबा बावडा येथील 69 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या गावचावडी, तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटक म्हणून उपस्थित राहिलेले आ. डॉ. विश्वजीत कदम यावेळी बोलताना म्हणाले की देशात काँग्रेसच्या 99 खासदारांचे 100 खासदार करण्यात कोल्हापूरकरांचा हातभार आहे. सध्या खा. विशाल पाटील यांच्यासोबत सांगली जिल्ह्याचे दौरे सुरू आहेत लवकरच आम्ही कोल्हापूरकरांचे आभार मानण्यासाठी येणार आहोत. आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीतील वातावरण पुन्हा गरम होणार आहे.


दरम्यान यावेळी आ. सतेज पाटील यांचे कौतुक करताना आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की जसा बावडा सतेज पाटील यांच्या मागे सातत्याने आहे, तसाच एक दिवस उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील. बावड्यात आल्यानंतर या मातीचे जादू कळते, असे सांगून आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, जे करायचं ते चांगलेच करायचे. इतरांना आदर्श ठरेल असेच करायचे असा, सतेज पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांच्यामुळेच आज इतके मोठे भव्य वास्तु साकारली आहे. यावेळी त्यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या कोल्हापूरची असलेल्या जवळच्या नात्याबद्दल उल्लेख करून सांगली व कोल्हापूरचे पाहुण्यारावळ्यांचे संबंध आहेत, जे नेहमीच एकमेकांच्या फायद्याचे ठरतात. 

५ सप्टेंबर रोजी कडेगाव येथे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे येणार असून, या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रणही यावेळी आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी उपस्थितांना दिले.