Sangli Samachar

The Janshakti News

हॅनाची सुटकेस : माणूस आणि माणुसकीचं दर्शन घडवणारे पुस्तक - (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. ३० सप्टेंबर २०२४
एक खुप छान पुस्तक आज वाचायला मिळाले, ‘हॅनाची सुटकेस.’ नाझीच्या छळ छावणीत १३ वर्षाच्या हॅनाला गॅसचेंबरमध्ये मारण्यात आले. क्रूर नाझींनी या १३ वर्षांच्या निष्पाप मुलीचा गॅसचेंबरमध्ये खून केला. तिचा गुन्हा तर ती ज्यू होती. 

मित्रांनो, आपले भाग्य आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. चांगले-वाईट सर्व कांही आपल्याला समजते. पण कधीकधी अंतरंगात खूप खोलवर रूतुन बसलेले वंश, धर्म, जात, पात, पंथ, कातडीचा रंग, यातील वैचारिक भिन्नता व उच्च नीचतेचे विचार क्रूर पशुही दाखवत नाहीत इतका क्रूरपणा दाखवण्यास कां व कशासाठी माणसाला प्रवृत्त करतात, काय साधते त्यातून ? त्यातून साधते कांही लोकांना अंहंभाव, पशुता पोसण्याची संधी पण बहुसंख्यांना दुःख, वेदना, यातना.     

लहान, सुंदर हॅनाची गोष्ट वाचताना डोळ्यात आलेले अश्रु मला थांबवता आले नाहीत.
सोनेरी केसांच्या सुंदर हॅनीच्या सुटकेस मधील एकेक चीजवस्तू पाहाताना, वरवर न दिसणाऱ्या पण माणसाच्या अंतरंगात लपून बसलेल्या तिरस्कार, गैरसमज, असहिष्णुता, पूर्वग्रह,  द्वेष, अहंकार, हिंसा, क्रूरतेचे व त्यांच्या भयानक परिणामांचे दर्शन जसे घडते, त्याच प्रमाणे अंतरंगामध्येच मूळतः असलेल्या दया, माया, ममता, चांगुलपणा, सहकार्य, बंधुभाव, प्रेम यांचेही दर्शन हॅनाची सुटकेस करते. 

एका बाजूला तीव्र दुःख, वेदना, छळ आणि त्याचवेळी खूप आनंदाची गोष्ट सांगणारे, माणसांच्या क्रूरतेच्या, त्याच्या भयानक परिणामांच्या इतिहासातील पानांची आठवण करून देणारी आणि त्याच बरोबर चांगल्या भविष्याबद्दलची आशा मनात निर्माण करणारी हॅनाची सुटकेस, मूळ इंग्रजी भाषेत कॅरन लीवाईन यांनी लिहिलेल्या Hunas’s Suitcase या पुस्तकाचे माधुरी पुरंदरे यांनी मराठी भाषिक वाचकांसाठी मराठीत भाषांतर आहे. जोत्स्ना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले मुद्दाम वाचण्यासारखे हे पुस्तक वाचनालयातून घेऊन येऊन वाचा, वाचनालयात उपलब्ध नसेल तर विकत घेऊन वाचावे, रू. २०० च्या आत घर बसल्या मिळू शकते. 


मित्रांनो, भोवतालच्या जगात वाईटपणा असला तरी चांगुलपणाही आहे, खरं तर परमेश्वराने निर्माण केलेले हे जग मुळात सुंदरच आहे आणि त्या मूळच्या सौंदर्यात तूम्हाला, मला, प्रत्येक माणसाला भर घालता येणे शक्य आहे, हा विचार हे पुस्तक वाचताना ठायीठायी जाणवतो.   
या पुस्तकातील हॅनाच्या मनातील विचार प्रगट करणारे एक गाणे -  
(गाण्यापुर्वीचा परिच्छेद -  (“छळ छावणीतील पहारेक-यांची नजर चुकवून असलेल्या संगीताच्या वर्गात मुली गाणी शिकत. पहारेक-यांना ऐकू जाऊ नये म्हणून त्या अगदी हळू आवाजात गात. रोज वर्ग संपताना एका मुलीला घरी शिकलेलं एक आवडत गाणं म्हणण्याची संधी दिली जाई. हॅनाची पाळी आली की ती ‘स्तोनात्स्का’ नांवाच गाणं म्हणे. स्तोनात्स्का म्हणजे शतपाद, शंभर पायांची अळी”)
“ सोपं नसतं तिच जिणं,
शंभर पाय दुखे पर्यंत चालणं
विचार करा, ते असतील किती दुखत !
मग तिनं तरी करावी किती कुरकुर !
त्यामुळे, मला जेव्हा रडूरडू होतं
तेव्हा मला तिची आठवण येते.
तिच्या पावलांवर पाऊल ठेवून 
चालत असल्याची मी कल्पना करते
आणि मग, मला माझं आयुष्य
खूपच सुखाचं वाटायला लागतं.”

खूप खोलवर विचार करायला चालना देणा-या या पुस्तकाबद्दलचे हे चार शब्द आणि आणि हा लेख इथे पूर्ण.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण