Sangli Samachar

The Janshakti News

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट हा आरोग्य सेवा महाग करणारा, संवाद सांगलीसाठी कार्यक्रमात पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
ऑनलाइन फार्मसी मुळे स्त्री-भ्रूण हत्या, बनावट प्रिस्क्रीप्शन व युवा वर्ग नशेच्या आहारी जाणे आदि गंभीर समस्या निर्माण होणार आहेत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा हा आरोग्य सेवा महाग करणारा आहे. त्यामुळे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनशी चर्चा करुनच कायदा करावा. औषध विक्रेता म्हणून मी व्यवसाय केला असल्याने मला माझ्या औषध विक्रेता बांधवांच्या समस्या माहित आहेत. आपल्याच फार्मासिस्ट बांधवांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिल्यास विधिमंडळात पहिल्यांदाच आपली बाजू लावून धरणार असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.

मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक हाॅल मध्ये झालेल्या 'संवाद सांगलीसाठी'या उपक्रमात सांगलीतील होलसेल व रिटेलर्स औषध विक्रेतांशी संवाद साधताना ते बोलत होते.


प्रारंभी सहकार तीर्थ माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित माहिती पट प्रदर्शित करण्यात आला. धन्वंतरी पूजन करून पृथ्वीराज पाटील यांनी जागतिक फार्मासिस्ट डे च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व दरवर्षी फार्मासिस्ट डे ला त्यांच्याकडून एक उत्कृष्ट फार्मासिस्ट पुरस्कार देण्याचे जाहीर केले.

यावेळी पृथ्वीराज म्हणाले, 'आजचा संवाद हा माझ्याच फार्मासिस्ट बांधवांच्या होम पिचवरचा आहे. फार्मसी प्रश्नांची सोडवणूक ही माझी कमिटमेंट आहे. मोकळेपणाने आपल्या व्यवसायातील प्रश्न व शहर विकासाचे मुद्दे मांडा. आपलाच प्रतिनिधी म्हणून विधीमंडळात आपला सांगलीचा आवाज असेल. 

यावेळी रावसाहेब पाटील, विनायक शेटे, सुशिल हडदरे, सागर साठे, सचिन सकळे,रविंद्र वळवडे, युवराज शिंदे, मीना मदने, अविनाश पोरे, अमोल गोटखिंडे, सुनिल नलावडे, राहूल जाधव,डॉ. जयपाल चौगुले, फिरोज शेख, महेश कोलप इ. नी औषध विक्री व्यवसायातील भेडसावणाऱ्या समस्या व शहर विकासाच्या मुद्दय़ावर मौलिक मते व्यक्त केली व आपलाच फार्मासिस्ट प्रतिनिधी विधीमंडळात पाठवू असे आश्वस्त केले. सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने औषध उद्योजक उपस्थित होते