Sangli Samachar

The Janshakti News

मराठा आरक्षणाला केवळ माझाच विरोध आहे हे सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडण्यास तयार - ना. देवेंद्र फडणवीस !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला घेरले आहे. विशेषतः त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अधिक आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी जर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिले नाही, तर राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विरोध करण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण फॅक्टरचा जोरदार फटका महायुतीला बसला आहे. त्यामुळे आता महायुतीचे नेते आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणावरून दगाफटका होऊ नये यासाठी ॲक्शन मोडवर आलेले आहेत. 


याचाच एक भाग म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून महायुतीला जेरीस आणलेल्या मनोज जरांगे यांना खुले आव्हान दिले आहे. एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी महाआघाडीच्या तिन्ही नेत्यांकडून लेखी आश्वासन घ्यावे की, ते सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देतील. मनोज जरांगे हे केवळ मलाच का टार्गेट करीत आहेत हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. काही लोक मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करीत आहेत.

आरक्षणासंबंधी सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना ठाकरे गट यांचे नेते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण इतरांच्या आरक्षणातून नको, असे सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यावेळी सांगितले आहे. याचा पुरावाही आमच्याकडे लेखी स्वरुपात आहे. परंतु वस्तुस्थिती लक्षात न घेता समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांच्या माध्यमातून होत आहे. आरक्षण देण्यात मी काही अडचण निर्माण करीत आहे हे सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडून राजकीय निवृत्ती घेईन, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.