| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ ऑगस्ट २०२४
महापुरात पूरपट्ट्यातील सांगलीकरांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवण्याची अवघड कामगिरी पृथ्वीराज पाटील फौंडेशनने करुन माणुसकीच्या शाश्वत मूल्यावरचा विश्वास दृढ केला होताच. आता पूर ओसरला, निवारा केंद्रातून आपापल्या घरी पूरबाधित नागरिक परतले . पूर जरी ओसरला तरी सलग १५ दिवस घरात पुराचे पाणी साचल्याने उग्र वास, डासांची उत्पत्ती, रोगराईच्या भितीने सुर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, जामवाडी परिसर, मगरमच्छ काॅलनी, आरवाडे प्लाॅट या भागातील नागरिक चिंताग्रस्त झाले होते. अशा संकटसमयी पुन्हा पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा काठावरील पूरबाधित भागात पृथ्वीराज पाटील फौंडेशनची टीम दाखल झाली. दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी यंत्रातून आज सुर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, पटवर्धन काॅलनी,कर्नाळ चौकी, शिवशंभू चौक परिसरातील गल्ली- बोळ, रस्ते, घराभोवतीचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली.या भागातील सुमारे १२५ घरात निर्जंतुकिकरणासाठी फौंडेशनकडून १५० पिशवीबंद फिनेलच्या बाटल्या त्या घरातील महिलांच्या हाती सुपूर्द करुन तातडीने फिनेलचा वापर करुन आतून घर स्वच्छ व निर्जंतुक करुन घ्यायची सूचना फौंडेशनकडून करण्यात आली. यामुळे त्या भागात प्रसन्न वातावरण निर्माण झाले.
पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या या औषध फवारणी मोहिमेत त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विशाल हिप्परकर,योगेश राणे,आरबाज शेख, मयूरेश पेडणेकर, शितल सदलगे, दिलावर पट्टेवाले, रावसाहेब नरळे, शुभम खिलारे तसेच पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे बिपीन कदम, सनी धोतरे, आयुब निशाणदार, आशिष चौधरी व मनोहर मासाळ, अमोल जाधव, अनिल गायकवाड हे सहभागी झाले होते.
सांगली आपली आहे, आपल्या सांगलीकरासाठी संकटकाळी व नंतरही मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे आणि या सेवेत कर्तव्यपूर्तीचे खरे समाधान आहे अशी प्रतिक्रिया देऊन पृथ्वीराज पाटील यांनी उद्याही फौंडेशनकडून उर्वरित पूरबाधित भागात औषधफवारणीसाठी टीम दाखल होणार असल्याचे सांगितले.