Sangli Samachar

The Janshakti News

छत्रपती शिवराय पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे फरार, परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याने दिल्लीश्वर नाराज !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ ऑगस्ट २०२४
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील अवघ्या आठ महिन्यापूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझ पुतळा नुकताच कोसळला. याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर पाटील यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र याचे कोणकोण लागतातच शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला असून कल्याण मधील त्याच्या घरात कुलूप आहे.

पुतळा उभारण्याचे कोणताही पूर्व अनुभव नसताना, महाराष्ट्राच्या करोडो शिवभक्तांच्या आदरस्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम दिल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याला नेमक्या कोणत्या कारणास्तव हे काम देण्यात आले ? असा प्रश्न शिवभक्त विचारत आहेत. 


कल्याण येथील जयदीप आपटे चे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून कमर्शियल आर्ट पदविका व नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिल्पकलेचा डिप्लोमा घेतला आहे. मात्र त्याला इतका मोठा पुतळा उभारण्याचा कोणताही अनुभव नाही. असे असतानाही त्याला पुतळा उभारण्याचे हे काम कोणाच्या शिफारसी वरून सोपवण्यात आले होते, असाही सवाल करण्यात येत आहे.

दरम्यान पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्र शासन हा संवेदनशील विषय हाताळण्यात कमी पडल्याने दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री अथवा जबाबदार मंत्र्यांनी याबाबत जनतेत असलेली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र ही जबाबदारी नौदल विभागावर ढकलण्यात आली. त्याचवेळी शासनातील व महायुतीतील नेत्यांनी हास्यास्पद केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.



भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने याबाबत महाराष्ट्र शासन व महायुतीतील नेत्यांची कानउघडणी केल्याची चर्चा सुरू असून, आता जबाबदार व्यक्तीने याबाबत नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अवघ्या दोनच महिन्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी महायुतीला परवडण्यासारखी नाही. त्यामुळे याचा फटका निवडणूक निकालावर होऊ नये याची काळजी घेण्याची सूचनाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.