Sangli Samachar

The Janshakti News

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. नितीन गडकरी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष आपआपल्या परीने जोरदार तयारी करीत आहेत. महायुती तसेच महाआघाडी मधील वरिष्ठ नेते याबाबत रणनीती आखत असून, निवडणुकीचा अनुभव असलेल्या हुकमी एक्क्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते केंद्रीय नेत मंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते ना. नितीन गडकरी यांच्यावर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिले आहे.

ना. गडकरी हे गेले अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारण यामधील मातब्बर मानले जातात. रोखठोक वक्तव्य आणि नेमक्या वर्मावर बोट ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे कनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे कोणता नेता भाजपच्या विजयाआड येऊ शकतो, त्यामुळे कोणाला, कुठे, कसे रोखायचे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आणि हीच बाब हेरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे जबाबदारी देण्यात येणार आहे.


ना. नितीन गडकरी यांच्याकडे एक व्हिजन असलेले नेतृत्व म्हणून समाजात मान प्रतिष्ठा आहे. केवळ राजकारणातीलच नव्हे तर समाजकारण आणि सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवरांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. यामुळे महायुतीला विजयासमिप कुठल्या क्षेत्रातील, कोणाचा, कसा उपयोग करून घ्यायचा, याचीही खुबी ना. नितीन गडकरी यांना प्राप्त आहे. आणि म्हणूनच आजवर स्वपक्षातून व बाहेरून अनेक अडथळे आले तरी ते नागपूर मधून सातत्याने निवडणूक जिंकत आले आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील महत्त्वाच्या नेत्यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते.

आणि म्हणूनच सध्या महाराष्ट्रात असलेल्या महायुतीवरील नाराजी बाबत कोणती व कशी खेळी खेळायची, हे ना. नितीन गडकरी यांच्याशिवाय अन्य कोण जाणू शकते ? सध्या 'झाले गेले विसरून' संघाने पुन्हा भाजपाच्या पाठीशी उभा राहण्याची तयारी केली आहे. ना. नितीन गडकरी आरएसएस व भाजपा दोन्ही पातळीवर एक महत्त्वाचे नेते मानले जातात. यामुळे दोन्ही घटकाशी योग्य तो समन्वय साधत, भाजपापासून दूर गेलेला संघप्रेमी व मतदार या सर्वांनाच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारां पाठीमागे उभे राहण्यासाठी ना. नितीन गडकरी हे अत्यंत प्रभावी काम करू शकतात. हीच महत्त्वाची बाब त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे.