Sangli Samachar

The Janshakti News

आदित्य ठाकरे यांच्या मराठा आरक्षणावरील वक्तव्याने 'गोल तरी होईल किंवा घोळ तरी' !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
मराठा आरक्षणाने आपली पूर्वीची नरमाईची भूमिका सोडून महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना जेरीस आणले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते आपल्या मतदारसंघात दौरे करीत असताना मराठा समाजातील आंदोलन त्यांना अडवून आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करायला भाग पाडत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे कोंडी झाली आहे. कारण मराठा समाजाची बाजू घ्यावी तर ओबीसी मतदार नाराज होतो, नाही घ्यावी तर मराठा समाज नाराज होतो. प्रकरण इथेच थांबत नाही. तर दोन्ही समाज आपल्या संपर्कातील प्रत्येक समाजाच्या मतदाराला आपल्या बाजूने वळवताना दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत, ओबीसी असो की मराठा, दोन्हीकडून फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर युवा सेना नेते आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना, विंचूर चौफुली येथे मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला आणि आरक्षणाबाबत जाहीर करण्याची मागणी केली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी जी भूमिका जाहीर केली, त्यामुळे भाजपाचे टेन्शन वाढवले आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की दिल्लीचे नायब राज्यपाल बदलाचे होते तर केंद्र सरकारने एका रात्री अध्यादेश काढला. वक्फ बोर्ड बाबतचा अध्यादेशही असाच तातडीने काढला. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत 'मोदी हे तो मुनकीन है |' हे तत्व का लागू होत नाही ? मोदींनी मनात आणले तर एका रात्रीत मराठा आरक्षण ओबीसींना न दुखावता ही लागू होऊ शकते. अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांना दिली. 'केंद्र शासनाने असा अध्यादेश काढला तर महाविकास आघाडी त्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील', असे आश्वासनही दिले.


मराठा आरक्षणावरून भाजपाने समाजाला तीन वेळा फसवले आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या निवडणुकीच्या वेळी आपण सत्तेवर एकदाच दोन महिन्यात आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. पण त्यांनी दिलेले आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाबद्दल भीम गर्जना केली होती त्याचे काय झाले हे त्यांनाच ठाऊक, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. 


आता आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य 'परवलीचा शब्द बनणार आहे'. आणि म्हणूनच भाजपा सह महायुतीतील सर्वच पक्षांचे टेन्शन वाढले आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी आरक्षणाच्या निर्णयाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात फटकावला आहे. ज्यामुळे 'गोल तरी होईल किंवा घोळ तरी' !...