Sangli Samachar

The Janshakti News

अवघ्या आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला शिवछत्रपतींचा पुतळा जमीनदोस्त ! विरोधकांकडून जोरदार टीका !


| सांगली समाचार वृत्त |
सिंधुदुर्ग - दि. २७ ऑगस्ट २०२४
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या आठ महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा अचानक जमीनदोस्त झाला आणि संपूर्ण राज्यात वादाचा धुरळा उठला. हा शिवरायांचा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र नौदलातर्फे उभारण्यात आलेल्था या पुतळ्याचे काम महायुती सरकारला घेण्यास कारणीभूत ठरत आहे. शिवप्रेमी मधूनही प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा कोसळल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्ग चे आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला. हा पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील एका कंत्राटदारांकडून करण्यात आले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांच्या कचाट्यात सापडले. 


शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर इतिहासकार इंग्रजीत सावंत यांची फेसबुक वरील पोस्ट चर्चेत आली. " हा पुतळा बसवला त्याच वेळी माझ्यासारख्या अभ्यासकांना या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल तसेच मजबुती बद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही याबद्दल त्यावेळेस आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलो होतो. परंतु संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2024 रोजी मी पुतळा स्थळाला भेट दिल्यानंतर हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही असे सांगितले होते. हे शिल्प बदलावे अशी मागणी हे मी त्यावेळी केली होती." असे सावंत यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.


वास्तविक नौदलासारख्या प्रख्यात आस्थापनेने केलेले हे काम चिरंतर व्हायला हवे होते. ते मजबूत आणि सुंदर होणे गरजेचे होते. परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून छत्रपतींचे स्मारक व पुतळा घाईगडबडीत उभारण्यात आले. भाजपाला शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. असा आरोपही इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते जयंत पाटील यांनी आरोप करताना म्हटले आहे, त्यांना केवळ मोदींच्या हस्ते शिवरायांचा पुतळा उभारायचा होता. पुतळ्याच्या दर्जाशी काहीही देणे घेणे नाही, असा हल्ला बोल जयंत पाटील यांनी केला. हे इव्हेंट सरकार आहे, कमिशन घेणं आणि कंत्राट वाटणं एवढंच काम सरकार करीत आहे त्याला दर्जा अशी काहीही देणे घेणे नाही असेही टीका जयंत पाटील यांनी केली आहे.


काँग्रेसचे युवा नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनीही शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याने टीका केली आहे. अवघ्या सहा महिन्यात हा पुतळा पडतो म्हणजे या पाठीमागे काहीतरी काळेबेरे आहे, याचा योग्यता तपास यंत्रणेबाबत चौकशी करण्याची मागणी डॉ. कदम यांनी केली आहे. मोदींनी अनावरण केलेला पुतळा पडतो, याची खंत सत्ताधाऱ्यांसह कोणालाही वाटत नाही याचे दुःख आहे असेही डॉ. विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.


सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राट दाराकडे सोपवण्यात आले होते त्यांनी आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे अशी प्रतिक्रिया (शरद पवार गट) राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, शिवछत्रपतींचा पुतळा पडल्याचे आम्हालाही दुःख आहे. याची योग्य ती चौकशी होईलच, परंतु हा पुतळा कोसळण्यामागे निकृष्ट बांधकाम नव्हे, तर ताशी 45 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे व मुसळधार पाऊस कारणीभूत असल्याचे सांगून, शिंदे यांनी यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे.