Sangli Samachar

The Janshakti News

अजब रुग्णालयाची गजब कहानी... उपचारासाठी मागितले ८ लाख ₹. आजार बरा झाला फक्त 128 रुपयात !


| सांगली समाचार वृत्त |
लखनौ - दि. २७ ऑगस्ट २०२४
आपल्या आयुष्याची किंमत किती ? एखाद्या उपचारासाठी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सांगतील तितकी... कारण एकदा दवाखान्यात गेल्यानंतर रुग्ण बरा व्हावा म्हणून, आपण पैशाकडे पाहत नाही. बरं ! आजार किती गंभीर आहे, याची माहिती आपणास असत नाही. चाचण्या होत राहतात, दिले निघत राहतात, आपण पैसे देत जातो... इतका खर्च होऊनही रुग्ण बरा होईलच याचीही शाश्वती असलेच असे नाही... पण तरीही आपण आपला रुग्ण बरा व्हावा म्हणून लाख लाख रुपयांची बिले दवाखान्यात भरत असतो. आपल्यालाही असा अनुभव आला असेलच... आणि मग आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात... "डॉक्टर आहे की कसाई ?"... अर्थात रुग्णांना लुटणारी जमात प्रत्येक न रुग्णालयात असतेच असे नाही. अनेक ठिकाणी आपल्याला अत्यंत सुखद अनुभव येतात... आणि तिथे मात्र आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतात, "डॉक्टर नव्हे, देवदूत आहेत !"... 

अगदी याच्या उलट अनुभवही डॉक्टर्सना येत असतात... गंभीर आजाराचा रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर, डॉक्टर्स काउंटरवर पैसे भरायला सांगतात. ते जमा झाले की, उपचार सुरू करतातही. दुर्दैवाने आजार इतका बळावलेला असतो की, सर्व कसब पणालाही लावून रुग्ण दगावतो. आता यात डॉक्टरांची चूक म्हणायची का ?... पण रुग्णांचे नातेवाईक चीडीस पडतात, डॉक्टरांना मारहाण केली जाते, दवाखाने फोडले जातात... याला जबाबदार कोण ? असो...


अनेकांना, अनेक ठिकाणी आलेला असाच एक अनुभव उत्तर प्रदेशमधील रुग्णाच्या नातेवाईकांना आला. एका रुग्णाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरने तपासणी करून, आठ लाख रुपये नातेवाईकांना भरण्यास सांगितले. नातेवाईकांच्याकडे इतकी मोठी रक्कम नसल्यामुळे त्यांनी रुग्णाला दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालय रुग्णाला डिस्चार्ज देण्यास तयार नव्हते... शेवटी रक्कम नाहीच म्हटल्यानंतर, 'होय नाही होय नाही करत' रुग्णाला डिस्चार्ज दिला...

सदर नातेवाईक या रुग्णाला घेऊन दुसऱ्या दवाखान्यात पोहोचले त्याच्यावर उपचारही झाले... बिल झाले अवघे 128 रुपये. रुग्णाला फक्त गॅसेसचा त्रास होता. रुग्ण बरा होऊन हसत हसत घरी निघून गेला. नातेवाईकही खुश झाले. पण सर्वांनाच प्रश्न पडला 128 रुपयात बरा होणाऱ्या आजारासाठी आठ लाख रुपये कशासाठी मागितले ? 

सदर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या छातीत दुखत असल्याने तो ओपीडी मध्ये आला होता. त्याची तपासणी केल्यानंतर रुग्णाच्या रक्तात ट्रोपोनिन 1 चे प्रमाण अधिक दिसून आलं. रुग्णाला हृदय विकाराचा त्रास होत होता. इसीजी मध्ये रूदयात ब्लॉकेजची शक्यता असल्याचे लक्षात आल्यानंतर ऍन्जिओग्राफी केली, तेव्हा एका धामणी मध्ये 80 टक्के ब्लॉकेज असल्याचं आढळलं. आम्ही अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देऊन खर्च सांगितला. पण नातेवाईक तयार नसल्याने, आम्ही कोणतेही आढेवाडे न घेता रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. सदर रुग्णाचे रेकॉर्ड हॉस्पिटलमध्ये आहे. आम्ही कोणतेही असबे वर्तन केले नसल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले.

दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करून लूट करणाऱ्या रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने सदर रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदर चौकशीत रुग्णालय दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे... आता ही चौकशी झाल्यानंतर येईल ? रुग्णालयावर कारवाई होणार का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत