Sangli Samachar

The Janshakti News

स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, (उबाठा) शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे, यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

देशाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, म्हणजेच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्व. पतंगराव कदम यांनी आयुष्यभर सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी डोंगराएवढे मोठे काम केले आहे. पलूस-कडेगाव तालुक्याचे ते भाग्यविधाते मानले जातात. भारती विद्यापीठासारखी मोठी संस्था त्यांनी उभी केली आणि संपूर्ण भारतभर तिचा विस्तार केला.


राज्य मंत्रिमंडळात स्व. डॉ. पतंगराव कदम यांना मानाचे स्थान होते. त्यांनी उद्योग, वाणिज्य, शिक्षण, वन, सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून, अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राज्याच्या विकासाला गती दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर लोक तीर्थ हे स्मारक उभे केले आहे. याच ठिकाणी स्व डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे. याचे अनावरण दिनांक पाच रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होत आहे. 

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कडेगाव येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमी नागरिक व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातून दोन लाख नागरिक व कार्यकर्ते उपस्थित राहतील. पावसामुळे येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे भव्य मंडपाची व्यवस्था केली असल्याची माहितीही डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी दिली. 
या पत्रकार बैठकीसाठी खा. विशाल पाटील, काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज, बाबा पाटील, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, काँग्रेसच्या महिला नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.