Sangli Samachar

The Janshakti News

कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन... (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २३ ऑगस्ट २०२४
कांही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला किशोरकुमारने गायलेल्या दूर गगन की छांव में या सिनेमातील शैलैंद्र लिखीत “कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन” या गाण्याची व्हिडीओ क्लिप माझ्या व्हॉटसएप नंबरवर शेअर केली. गाण्याचे शब्द होते 
“अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथी सारे
हाय! कहाँ गये, हाय ! कहाँ गये !
कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन !
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पल छिन 
कोई लौटा दे ...
मैं अकेला तो ना था, थे मेरे साथी कई 
एक आँधी सी उठी, जो भी था लेके गई 
आज मैं ढूँढूं कहाँ, खो गये जाने किधर 
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पल छिन
कोई लौटा दे ...
मेरे ख्वाबों के नगर, मेरे सपनों के शहर 
पी लिया जिनके लिये, मैंने जीवन का ज़हर 
ऐसे भी दिन थे कभी, मेरी दुनिया थी मेरी 
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पल छिन
कोई लौटा दे ...

गाण्याच्या शब्दांनी मला माझ्या बालपणात नेऊन सोडले. आणि मला आठवले. वयाच्या ३–४ थ्या वर्षी मी जात असलेली ती बालवाडी. मुलांना बालवाडीत घेऊन जाण्यासाठी रंगी-बेरंगी कपड्यांच्या झालरींनी मढवलेली दोन घोड्यांची बग्गी असायची. बालवाडीत मला घेऊन जाण्यासाठी बग्गी आमच्या घरापुढे येऊन थांबायची आणि बग्गीचा गाडीवान बग्गीला लटकवलेली घंटी वाजवायचा, ‘टीन-टीन’. 
बग्गीची घंटी ऐकली की मी घरातून आईने दिलेला खाऊचा डबा हातात घेऊन पळत सुटत असे आणि उडी मारून बग्गीत मोक्याची जागा पकडत असे. मी बग्गीत येऊन बसलो की, बग्गीचा गाडीवान त्याच्या हाताने लगाम एकदा-दोनदा वर-खाली करायचा आणि बग्गीचे घोडे पळू लागायचे. 


‘टॉक-टू, टॉक-टू’ आवाज करत बग्गीचे घोडे दुडक्या चालीने पळायचे. ते पळत असतांना त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा येणारा ‘टीन-टीन’ असा मंजुळ आवाज मला खूप आवडायचा. बग्गीत बसून बाहेरची मज्जा पाहताना माझा जीव कसा हरकुन जायचा. रस्त्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट मी माझ्या डोळ्याने टिपून घेत असे.
बालवाडी आली की बग्गी थांबायची. माझ्या बालवाडीचे नांव होतं ‘शिशु विकास मंदिर’. बालकांचा विकास करणारे मंदिर.  

बग्गीतून उतरून आम्ही सगळी मुले बालवाडीत जायचो. बालवाडी दोन मजली इमारतीत होती. वरच्या मजल्यावर असलेल्या एका मोठ्या हॉलमध्ये आम्हा सगळ्या मुलांना बसवायचे. बालवाडीतील बाई चिऊ-काऊच्या छान गोष्टी सांगत. बडबडगीत स्वतः गात आणि आम्हां मुलांना पण गायला शिकवत. मला ही सगळी गाणी पाठ झाली होती. 
“करंगळी मरंगळी मधले बोट चाफेकळी अंगठा”
या शब्दांचा अर्थ काय, आपण काय म्हणतो याच्याशी आम्हा मुलांचा दुरान्वयानेही संबंध नसायचा. बाई कसे सांगतात तसे म्हणायचे, हावभाव करायचे बस्स एवढेच आम्हाला समजायचे. 


बालवाडीत आम्हा मुलांना रांगेने कसे चालायचे, हाताची घडी, तोंडावर बोट म्हंटले की काय करायचे ते सांगत. त्यातलं सगळंच कांही मला समजायचं असं नाही. मग कांही मजेदार खेळ खेळायचा. सोबत नेलेला डबा खाऊन झाला की सुट्टी. पुन्हा एकदा बग्गीत बसुन ती सगळी मज्जा लुटत घरी यायचं आणि आईच्या गळ्याला मिठी मारून कायकाय शिकलो ते हावभावासकट म्हणून दाखवायचे. असे करत संध्याकाळ व्हायची. आई देवापुढे दिवा लावताना तिच्या बाजूला बसायचे. ती सांगेल तसे म्हणायचे आणि नमस्कार करायचा. थोड्या वेळाने जेवायचे आणि झोपी जायचं की संपला दिवस.  
   
तर अशी ही बालवाडी, ती बडबडगीते, चिऊ-काऊच्या गोष्टी, घोड्याची बग्गी, डब्यातील खाऊ, ती जम्माडीजंमत आणि असे बरेच कांही मला खुप-खुप आवडायचे. आज ते दिवस मागे पडले. आता राहिल्या फक्त त्यांच्या सुखद आठवणी. 

कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन, 
वो प्यारे पल छिन...
आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण