Sangli Samachar

The Janshakti News

शाळेतील आपली लहान मुलगी घरी आल्यानंतर प्रत्येक पालकांनी 'हे' प्रश्न विचारायलाच हवेत !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २३ ऑगस्ट २०२४
बदलापूर, अकोला, पुणे आणि कोल्हापूर पाठोपाठच्या मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यानंतर आपली कन्या सुरक्षित आहे का ? असा काळजीयुक्त प्रश्न राज्यातील प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर दिसून येऊ लागला आहे. या घटनांनंतर महाराष्ट्र शासन अलर्ट मोडवर आले असून. प्रत्येक शाळेसाठी नियमावली तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे. परंतु मुलींची सुरक्षितता ही केवळ शासन व पोलीस यांचीच नाही, तर ती ज्या शाळेत शिकते तेथील व्यवस्थापकीय मंडळ, प्रशासकीय मंडळ त्याचबरोबर समाजाचीही आहे. तितकीच ती मातापित्यांचीही आहे.

एखादी बालिका आपल्या पालकांपेक्षा अधिक तर शाळेत, क्लासमध्ये, ग्राउंडवर किंवा इतरात्र तिचा वावर अधिक असतो. आणि या सर्वच ठिकाणी या पुढील काळात प्रत्येक संवेदनशील नागरिकांनी मुलींची सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे. भले ती मुलगी अन्य कुणा माता-पित्याची असो. पण तिच्यासोबत जर काही गैर घडत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे.

पण या पार्श्वभूमीवर पालकांची आणखी एक जबाबदारी आहे. ती म्हणजे आपल्या मुलीला याबाबत 'सतर्क' करणे. यासाठी पारंपारिक मातेची भूमिका सोडून तिला इतर ज्ञानाबरोबरच 'स्पर्शज्ञान' ही दिले गेले पाहिजे. 'मुलगी लहान आहे, हे मी कसे सांगू ?' 'हे मी कसे बोलू ?' 'हे मी कसे शिकवू ?' 'हे मी कसे विचारू ?' असल्या शंका आता मातेने आपल्याच मनातून काढून टाकायला हव्यात.


मुलगी शाळेतून आले की तिला, 'आज शाळेत काय शिकवले ?' 'कोण कोण शिक्षक वर्गावर आले होते ?' 'तुझ्यासोबत काही गैर घडले का ?' 'कुणी तुला त्रास दिला का ?' 'तू बाथरूमला जाताना तुझ्याबरोबर कोण असते ?' अशा प्रकारचे प्रश्न विचारून तिला बोलते करायला हवे. 'गुड टच-बॅड टच' बद्दलचे शिक्षण मातांनी आणि शाळेतील शिक्षकांनी लहान बालकांना द्यायलाच हवेत. 

शाळेतील शिक्षक असो, प्रत्येक वर्गातील विद्यार्थी असो, शिपाई असो, स्कूलबस चालक असो, या सर्वांची मानसिकता तपासण्याची गरज बदलापूरच्या शाळेतील घटनेने सर्व समाजाला व पालकांना शिकवली आहे. आणि म्हणूनच पालकांनी आता याबाबत अधिक सतर्क व्हायला हवे. घटना घडल्यानंतर 'मेणबत्त्या पेटवल्या जातात', 'संताप व्यक्त केला जातो', 'गुन्हेगारांना शिक्षाही होते'. समाज काही काळानंतर हे विसरून जातो... पुन्हा अशीच घटना घडल्यानंतर पुन्हा तेच पहावयास मिळते. आता बस्स झाले... मुलींचे चारित्र्य सुरक्षित राहायलाच हवे... यासाठी केवळ शासन व पोलीस प्रशासन यांच्यावर अवलंबून राहण्याऐवजी, स्वतःच स्वतःचे रक्षण करण्याची वेळ आली आहे.